Reliance AGM 2023: देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी एजीएम आज पार पडली. देशात हजारो कंपन्या असल्या तरी सर्वात जास्त चर्चा आहे ती रिलायन्सच्या एजीएमची होती. यावेळी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी आकाश, अनंत आणि ईशा अंबानी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपण्याची घोषणा केली. त्यांना रिलायन्सच्या संचालक मंडळात सहभागी करण्यात आलं. दरम्यान, बहुप्रतिक्षीत असलेल्या जिओ एअर फायबरची यावेळी घोषणा करण्यात आली.
जिओ एअर फायबर गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच करण्यात येणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. याशिवाय आजपासून जिओ स्मार्ट होम सर्व्हिसेस लाँच केल्याचं आकाश अंबानी म्हणाले. ब्रॉडबँड सेवेद्वारे जिओ स्मार्ट होम वर भर देण्यात येणार आहे. ही सेवा तेजीनं वाढवण्यात येणार असल्याची माहिती आकाश अंबानी यांनी दिली.
आम्ही इंडस्ट्रीसाठी जिओ ट्रू ५जी लॅबची घोषणा केली आहे. यामुळे इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशन येईस. प्रत्येक घर मॅनेज करण्याचा अनुभव बदलणार आहे. जिओ फायबरचे यापूर्वीच १ कोटीपेक्षा अधिक ग्राहक आहे. यासोबतच नवे ग्राहक जोडलेही जात आहे. AirFiber द्वारे आमचा कस्टमर बेस वाढून २० कोटींपेक्षा अधिक घरांपर्यंत पोहोचेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
काय म्हणाले मुकेश अंबानी?
जिओ सात वर्षांपूर्वी लाँच करण्यात आले होते. भारताला प्रीमिअर डिजिटल सोसायटी बनवणं आमचं ध्येय होतं. नव्या भारतासाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जिओची महत्त्वाची भूमिका आहे. आता आमची व्याप्ती भारताबाहेर पोहोचली आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले.
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये रिलायन्सनं २.६ लाख नोकऱ्या दिल्याचं अंबानी आपल्या शेअरधारकांना संबोधित करताना म्हणाले. रिलायन्स जिओचा प्रति महिना खर्च होणारा डेटा ११०० कोटी जीबी आहे. महिन्याला प्रत्येक युझर सरासरी २५ जीबी डेटाचा वापर करत आहे. प्रति महिना ट्रॅफिक ४५ टक्क्यांनी वाढला आहे. केवळ ९ महिन्यांत ९६ टक्के शहरांमध्ये रिलायन्स जिओचं ५जी कव्हरेज आल्याचं अंबानी यावेळी म्हणाले. रिलायन्स जिओनं ४५ कोटी सबस्क्रायबर्सचं लक्ष्य पार केल्याचंही त्यांनी सांगितलं.