Reliance AGM 2024 : : मुकेश अंबानी यांच्या देशातील सर्वात मौल्यवान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजची ४७ वी सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. यावेळी अंबानींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. एजीएमदरम्यान मुकेश अंबानींनी २जी मुक्त भारताचा नारा दिला. "आज देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रिलायन्स जिओ पोहोचला आहे. रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठा पेटंट होल्डर बनलाय," असं ते म्हणाले.
"जिओकडे ५जी, ६जी मध्ये ३५० पेक्षा अधिक पेटंट्स आहेत. कंपनीनं ५जी फोन्स सामान्यांपर्यंत पोहोचवलेत. २ वर्षांत जिओसोहत १३ कोटी ५जी चे ग्राहक जोडले गेले. आता २जी चे ग्राहकही ५जी वर अपग्रेड करत आहेत," असं अंबानी म्हणाले.
एआयवरही केलं भाष्य
आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलताना मुकेश अंबानी यांनी जिओच्या पुढील योजनेची माहिती दिली. "प्रत्येक भारतीयाला एआयशी जोडणं हे आमचे ध्येय आहे. लोकांना एआयशी जोडण्याचे वचन आम्ही पूर्ण करू. त्यासाठी Jio Brain च्या नावानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणलं जाणार असून गुजरातमधील जामनगर येथे एआय डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. 'जिओ ट्रू ५जीनं जगातील सर्वात जलद ५जी स्वीकारण्याचा विक्रमही केला आहे. हे जगातील सर्वात प्रगत ५जी नेटवर्कपैकी एक बनलं आहे," असं त्यांनी नमूद केलं.