hyperlocal delivery startup dunzo : अलीकडच्या काळात क्विक कॉमर्स अर्थात झटपट वितरण क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. प्रत्येक गोष्ट आता १० मिनिटांच्या आत घरपोच मिळत आहे. या क्षेत्राचा विस्तार पाहता मोठे खेळाडू यात उतरत आहेत. अशा परिस्थिती उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने गुंतवणूक केलेली एक क्विक कॉमर्स कंपनी डबघाईल आला आहे. गेल्या १८ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार मिळाला नाही. ही कंपनी कोणती सेवा देत होती? डब्यात जाण्याचं कारण काय? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
रिलायन्सची गुंतवणूक असलेली इन्स्टंट डिलिव्हरी प्लॅटफॉर्म डन्झोच्या (Dunzo) अडचणी वाढल्या आहेत. कंपनीचे सह-संस्थापक कबीर बिस्वास आता वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टच्या क्विक कॉमर्स ऑपरेशन मिनिट्सचे नेतृत्व करणार आहेत. डन्झोची सुरुवात २०१४ मध्ये व्हॉट्सॲप ग्रुप म्हणून करण्यात आली होती. त्यांनी बेंगळुरूमध्ये पिक-अप आणि ड्रॉप सेवा सुरू केली होती. नंतर देशभर तिचा विस्तार केला. मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिटेलने २०२२ मध्ये डन्झोमध्ये २४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करत सर्वात मोठी शेअरहोल्डर झाली. या डीलद्वारे, रिलायन्स रिटेलने डन्झोमध्ये २५.८% हिस्सा खरेदी केला. याच कंपनीने देशात हायपरलोकल डिलिव्हरी सुरू केली होती.
मात्र, गेल्या काही वर्षांत स्टार्टअपला गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कंपनीतील कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांहून अधिक काळ पगार मिळालेला नाही. बिस्वास स्वत: बराच काळ वेतनाशिवाय काम करत राहिले. त्यांचे सहकारी सह-संस्थापक मुकुंद झा, दलवीर सुरी आणि अंकुर अग्रवाल यांनी आधीच कंपनी सोडली होती. अखेर बिस्वास यांनी देखील डन्झोला रामराम केला.
देशात क्विक कॉमर्सचे क्षेत्रात झपाट्याने वाढ
देशाच्या झटपट वितरण सेवा क्षेत्रात डन्झोने अलीकडेच एन्ट्री केली होती. येथे ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इंस्टामार्टशी स्पर्धा आहे. २०२६ पर्यंत देशातील क्विक कॉमर्स बाजारपेठ २० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. स्विगीच्या इंस्टामार्ट, झोमॅटोच्या ब्लिंकिट आणि झेप्टोने बाजारपेठेत चांगले पाय रोवले आहेत. मोठ्या खेळाडूंसमोर डन्झोला वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. धोरणात्मक चुका, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि ऑपरेशनल आव्हानांच्या मालिकेमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
कंपनीने डन्झो डेली ही १५-२० मिनिटांची किराणा वितरण सेवा सुरू केली. कंपनीचा मासिक खर्च १०० कोटींहून अधिक झाला आहे. आयपीएलचे महागडे प्रायोजकत्व आणि विपणन मोहीम हे त्याचे कारण होते. त्यामुळे कंपनीचा रोख वापर खूप वाढला. कंपनीचा रोख साठा कमी होत गेला आणि निधीही कमी झाला. दरम्यान, फ्लिपकार्टने कंपनी विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र गुंतवणूकदारांनी त्याला विरोध केला.
कंपनी कशी उद्ध्वस्त झाली
रिलायन्स रिटेलही डन्झोमध्ये अतिरिक्त भांडवल टाकण्यापासून दूर राहिले. आर्थिक दबाव वाढल्याने कंपनीची अंतर्गत स्थिरता कोलमडली. सह-संस्थापक दलवीर सुरी आणि मुकुंद झा यांच्यासह ५ मंडळ सदस्य निघून गेले. कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार मिळाला नाही. या काळात अनेकदा कर्मचारी कपातही झाली. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीचा तोटा १,८०० कोटी रुपयांपेक्षा तिप्पट झाला, तर महसूल चार पटीने वाढून २२६ कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीवर सुमारे ६० लाख डॉलर्सचं कर्ज आहे. दरम्यान, बिस्वास यांनीही डन्झोला बाय-बाय केल्याने कंपनीच्या उरलेल्या आशाही संपल्या.