मुंबई: दूरसंचार क्षेत्रात खळबळ उडूवन दिल्यानंतर आता जिओ नव्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. मुकेश अंबानींचारिलायन्स उद्योग समूह आता देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये जिओच्या नावानं पेट्रोलपंप सुरू करणार आहे. त्यासाठी कंपनीनं ब्रिटिश पेट्रोलियमसोबत करार केला आहे. या दोन्ही कंपन्या भारतात वेगानं स्वत:चं जाळं विस्तारणार आहेत. त्यामुळे आता दूरसंचार क्षेत्रानंतर आणखी एका क्षेत्रात जिओमुळे इतर कंपन्यांना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. सध्या देशभरात रिलायन्सचे १४०० पेट्रोलपंप आहेत. ब्रिटिश पेट्रोलियमसोबत हा आकडा ५५०० वर नेण्याचा मानस आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ब्रिटिश पेट्रोलियमबरोबर करार झाल्याची माहिती रिलायन्स समूहाकडून देण्यात आली. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत सर्व प्रकारच्या मंजुरी मिळवून रिलायन्स-ब्रिटिश पेट्रोलियम बाजारात दाखल होतील, असंदेखील रिलायन्सनं सांगितलं आहे. सध्या देशात रिलायन्सचे १४०० पेट्रोलपंप असून विमानतळांवर एकूण ३० इंधन केंद्र आहेत. भविष्यात या क्षेत्रातही रिलायन्स आणि ब्रिटिश पेट्रोलियम स्वत:चं जाळं आणखी विस्तारणार आहेत. पेट्रोल पंपांचं जाळं विस्तारणासाठी करण्यात आलेल्या नव्या करारानुसार रिलायन्स समूहाकडे ५१ टक्के तर ब्रिटिश पेट्रोलियमकडे ४९ टक्के भागिदारी असेल. रिलायन्स समूहातील भागिदारी विकत घेण्यासाठी ब्रिटिश पेट्रोलियमनं ७ हजार कोटी रुपये मोजले आहेत. २०११ नंतरचा हा दोन्ही कंपन्यांमधला तिसरा करार आहे. २०११ मध्ये ब्रिटिश पेट्रोलियमनं रिलायन्सच्या खनिज आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील उद्योगातील ३० टक्के हिस्सा खरेदी केला होता. तो करार ७.२ अब्ज डॉलरचा होता.
आणखी एका संघर्षाची चाहूल; जिओ लवकरच नव्या क्षेत्रात टाकणार पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 8:41 PM