भारतात ७० च्या दशकात सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात धुमाकूळ घातलेला कॅम्पा कोला ब्रँड आता नव्यानं बाजारात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी कॅम्पा कोला ब्रँड विकत घेतला आहे. नवी दिल्ली स्थित प्यूअर ड्रिंक्स ग्रूप रिलायन्सनं २२ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. याच प्यूअर ड्रिंक्स ग्रूप अंतर्गत 'कॅम्पा कोला' हे सॉफ्ट ड्रिंक तयार केलं जातं. अंबानींना आता सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात एन्ट्री करायची आहे. मग त्यासाठी 'कॅम्पा कोला' हा अतिशय उत्तम मार्ग ठरेल हे अचूक हेरुन अंबानींनी 'कॅम्पा कोला' बनवणाऱ्या कंपनीची खरेदी केली आहे. दरम्यान, यानंतर आता रिलायन्स आणखी तीन एफएमसीजी (FMCG Sector) ब्रँड्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गार्डन नमकीन, लाहोरी जीरा आणि बिंदू बेव्हरेज यांसारखे ब्रँड खरेदी करण्यासाठी रिलायन्सची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी ईटीला सांगितले की, या तीन कंपन्यांशी रिलायन्सची चर्चा प्रगत टप्प्यात आहे. कंपनीचे धोरण FMCG क्षेत्रातील समान ब्रँड्स घेण्याचे आहे. अहवालानुसार, रिलायन्सची सध्या या तीन प्रकरणांमध्ये कराराच्या अटींवर बोलणी सुरू आहे. दरम्यान, बिंदू बेव्हरेजेस आणि लाहोरी जीरा यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत.
“प्रोसेस्ड फूड आणि कंझ्युमर फूड सेक्टर दुहेरी आकड्यांमध्ये प्रगती करत आहे. याचं कारण भारताचा सातत्यानं विकास सुरू आहे आणि भारतीयांचा खर्चही वाढत आहे. कोणत्याही मोठ्या कंपनीने ग्राहक क्षेत्रात लक्षणीय विस्तार करण्याची योजना आखली आहे, त्यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये खाजगी ब्रँडचा समावेश करणे आवश्यक आहे. चांगले ग्राहक असलेले उदयोन्मुख नवीन ब्रँड मोठ्या खेळाडूंसाठी आदर्श लक्ष्य बनतात,” अशी प्रतिक्रिया फायनॅन्शिअल अॅडव्हायझरी सर्व्हिस पीडब्ल्यूसी इंडियाचे पार्टनर दिनेश अरोरा यांनी दिली.
एफएमसीजीमध्ये प्रवेशाचं सूतोवाच
२९ ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी यांनी कंपनीची रिटेल शाखा FMCG विभागात प्रवेश करण्यास सज्ज असल्याचं सूतोवाच केलं. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, भारतीयांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारी उच्च-गुणवत्तेची, परवडणारी उत्पादनं विकसित आणि वितरीत करण्याच्या उद्देशाने FMCG व्यवसाय सुरू करणार आहे.