Join us  

'त्या' एका कारणानं घटली मुकेश अंबानींची संपत्ती; चौथ्यावरून सहाव्या स्थानी घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:55 AM

टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ; अंबानींना मागे टाकलं

मुंबई: गेल्या काही आठवड्यांत जगातील श्रीमंतांच्या यादीत अतिशय वेगानं पुढे सरकरणाऱ्या उद्योगपती मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट झाली आहे. त्यामुळे ते चौथ्या स्थानावरून सहाव्या स्थानी घसरले आहेत. तर टेस्ला कंपनीचे संस्थापक एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. ते सध्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानी आहेत. मुकेश अंबानींनी काही दिवसांपूर्वीच यादीत चौथं स्थान पटकावलं होत. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सनुसार मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ७८.८ अब्ज डॉलर इतकी आहे. श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा जगात सहावा क्रमांक लागतो. या यादीत ऍमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस पहिल्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती १८८ अब्ज डॉलर आहे. यंदाच्या वर्षात बेजोस यांच्या संपत्तीत ७३ अब्ज डॉलरची घसघशीत वाढ झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे शेअर घसरत आहेत. त्यामुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीचं मूल्यदेखील घसरलं आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या संपत्तीचं मूल्य ७८.८ अब्ज डॉलर इतकं आहे. अंबानींच्या संपत्तीचं मूल्य कमी होत असताना टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली. मस्क यांची एकूण संपत्ती ८४.४ अब्ज डॉलर इतकी आहे. एकाच दिवसात मस्क यांच्या संपत्तीत ८ अब्ज डॉलर्सनं वाढ झाली. काल अमेरिकन शेअर बाजारात टेस्लाचे शेअर ११ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे मस्क यांची संपत्ती ८ अब्ज डॉलर्सनं वाढली. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मस्क यांच्यानंतर बनार्ड ऑर्नोल्ट यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती ८४.६ अब्ज डॉलर इतकी आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स