Join us

रिलायन्सने पार केला 8 लाख कोटींचा टप्पा; बनली पहिली भारतीय कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:16 PM

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज मैलाचा दगड पार केला आहे. रिलायन्सचे बाजार भांडवल तब्बल 8 कोटींवर पोहोचले आहे. हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप 26 हजार कोटींनी मागे आहे. 

गुरुवारी शेअर बाजाराने उसळी घेतल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बीएसईमध्ये शेअरने 1.5 टक्क्यांची वाढ नोंदवत 1290.90 रुपयांवर जाऊन पोहोचला. तर एनएनईमध्ये 1265.90 पर्यंत वाढला. 11 वर्षांनंतर 12 जुलैला रिलायन्सने दुसऱ्यांदा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला होता. आता रिलायन्सच्या जवळ असलेली कंपनी आयटी क्षेत्रातील टीसीएस ही एकमेव आहे. मात्र, रिलायन्स वेगाने पुढे सरकत आहे. टीसीएसचे बाजार मुल्य 7.79 लाख कोटी रुपये आहे. 

तेल ते टेलिकॉम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या रिलायन्सने आज मोठी झेप घेतली आहे. मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, 2025 पर्यंत रिलायन्स दुप्पट विस्तार करण्याचे स्वप्न पाहत आहे. 

रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या एक वर्षात 60 टक्के वाढ झाली आहे. तर याच कालावधीत टीसीएसचे शेअर्स 63 टक्क्यांनी वाढले आहेत.

टॅग्स :रिलायन्सरिलायन्स जिओशेअर बाजारटाटामुंबई