Dhirubhai Ambani Birth Anniversary: देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांची आज जयंती आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी जन्मलेले धीरूभाई अंबानी यांनी व्यवसायाच्या जगात प्रवेश केला तेव्हा त्यांच्याकडे ना वडिलोपार्जित मालमत्ता होती ना बँक बॅलन्स. रिलायन्स इंडस्ट्रीज ही आज देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्याचे साम्राज्य पेट्रोकेमिकल्सपासून दूरसंचार, रिटेल, ग्रीन एनर्जी आणि इतर अनेक क्षेत्रांपर्यंत पसरलेले आहे. आज आपण धीरूभाई अंबानींच्या प्रवासावर एक नजर टाकू.
धीरूभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधील चोरवाड या छोट्याशा गावातील शाळेतील शिक्षक होते. धीरूभाई अंबानी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट होती. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. धीरूभाई आपले शिक्षण हायस्कूलपर्यंतच पूर्ण करू शकले आणि त्यानंतर त्यांनी छोट्या-मोठ्या नोकऱ्या करायला सुरुवात केली. गिरनारच्या डोंगराजवळ ते पकोडे विकत असत. वयाच्या १६ व्या वर्षी धीरूभाई नोकरीसाठी येमेनला गेले. तेथे त्यांनी पेट्रोल पंपावर काम केलं. त्यांचं काम पाहून कंपनीनं त्यांना फिलिंग स्टेशनवर मॅनेजर बनवलं. पण काही वर्षे काम केल्यानंतर १९५४ मध्ये धीरूभाई भारतात आले.
कशी झाली सुरुवात?
देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथून धीरूभाईंनी आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला. १९५८ मध्ये, त्यांनी १५ हजार रुपयांच्या भांडवलासह रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन नावाचं कार्यालय उघडलं आणि मसाला व्यापारी म्हणून सुरुवात केली. त्यांच्या कार्यालयात एक टेबल, दोन खुर्च्या, एक रायटींग पॅड, एक पेन, एक इंकपॉट अशा वस्तू होत्या. त्याच्या ऑफिसमध्ये फोन नव्हता, पण जवळच्या डॉक्टरला पैसे देऊन ते त्यांचा फोन वापरायचे. पहिल्या दिवसापासून, धीरूभाईंनी मुंबईच्या घाऊक मसाल्याच्या बाजारपेठेत फिरणं सुरू केलं आणि तत्काळ डाऊन पेमेंटच्या अटीवर मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी विविध उत्पादनांचे कोटेशन गोळा केलं.
काही काळानंतर, मसाल्यांऐवजी सुताचा व्यापार केल्यास अधिक फायदेशीर ठरेल, असं त्यांना वाटलं. त्यांनी नरोडा येथे कापड गिरणी सुरू केली. इथून पुढे त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. धीरूभाईंनी विमल ब्रँड सुरू केला जो त्यांचे मोठे भाऊ रमणिकलाल अंबानी यांचा मुलगा विमल अंबानी यांच्या नावावर होता. १९७७ मध्ये त्यांनी कंपनीचा IPO आणला आणि त्यात ५८ हजार हून अधिक गुंतवणूकदार सहभागी झाले. ब्रोकर्सनं त्यांना शेअर बाजारात खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण धीरूभाई अंबानींनी अशी खेळी केली की त्यांच्यामुळे शेअर बाजार तीन दिवस बंद राहिला.
स्टेडियममध्ये एजीएम
रिलायन्सच्या शेअरचे भाव सर्वोच्च ठरले. ज्या ब्रोकर्सनं खेळी खेळली होती त्यांना अंबानीपुढे नतमस्तक व्हावं लागले. ९० चे दशक येईपर्यंत २४ लाख गुंतवणूकदार त्यांच्याशी जोडले गेले होते. त्यावेळी रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईतील स्टेडियममध्ये होत असे. धीरूभाई अंबानी एखाद्या रॉकस्टारप्रमाणे कंपनीच्या एजीएमला यायचे. मे १९८५ मध्ये त्यांनी मुंबईतील कूपरेज फुटबॉल ग्राउंड भाड्यानं घेतलं. यामध्ये रिलायन्सची एजीएम झाली आणि १९८४ चा निकाल मांडण्यात आला. यामध्ये सुमारे १२ हजार भागधारक सहभागी झाले होते. अनेकजण जमिनीवर बसले होते. देशातील कोणत्याही कंपनीच्या भागधारकांची ही सर्वात मोठी बैठक होती.
धीरूभाई अंबानींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर जी कंपनी उभारली ती कंपनी आता त्यांचा मुलगा मुकेश अंबानी यांनी शीर्षस्थानी नेली आहे. आज रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्मवर जगातील मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर रिलायन्स आता मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत आहे. मुकेश अंबानी हे आज भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.