अनिल अंबानी यांच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत. यामुळे या कंपन्यांचे शेअर्स पेनी कॅटेगरीमध्ये आले आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे रिलायन्स होम फायनान्स. या कंपनीच्या शेअरची किंमत 5.65 रुपये एवढी आहे. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या शुक्रवारी, हा शेअर गुरुवारच्या तुलनेत 4.82% वृद्धीने बंद झाला. 17 ऑगस्ट 2023 रोजी शेअर 1.61 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
शेअरचा परफॉर्मन्स -
रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरने यावर्षी 21 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एका महिन्यात हा शेअर 161 टक्क्यांहून अधिकने वाढला आहे. या समभागाने तीन महिन्यांच्या कालावधीत 175 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. काही वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 110 रुपयांवर पोहोचली होती. अशा प्रकारे, हा शेअर आतापर्यंत 99 टक्क्यांनी घसरला आहे.
अनिल अंबानी यांचा वाटा किती? -
रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, सप्टेंबर तिमाहीपर्यंत प्रमोटर्सची हिस्सेदारी 0.74 टक्के होती. यात अनिल अंबानी यांच्याकडे 2,73,891 शेअर्स होते. तर पत्नी टीना अंबानी यांच्याकडे 2,63,474 शेअर्स होते. अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी यांच्याकडे 28,487 शेअर्स होते. पब्लिक शेअरहोल्डिंगबद्दल बोलायचे तर ते 99.26 टक्के आहे. एक तिमाहीपूर्वी म्हणजेच जूनमध्ये प्रमोटर्सचा वाटा 43.61 टक्के एवढा होता. याच वेळी, सार्वजनिक भागीदारी 56.39 टक्के होती.
गेल्या डिसेंबर महिन्यात रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडने बीएसईला दिलेल्या महितीनुसार, 9 जानेवारीला कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक निर्धारित करण्यात आली आहे. या बैठकीत 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीचे निकाल जारी केले जातील.