Join us

Reliance AGM 2022 : पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी Reliance सुरू करणार नवी फॅक्टरी, पाहा काय आहे अंबानींचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 6:15 PM

Reliance AGM 2022 : नवीन गीगाफॅक्टरीमध्ये (Gigafactory) किफायतशीर आणि विश्वासार्ह पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं डिझाईन (Power Electronics) आणि उत्पादन केलं जाईल.

Reliance AGM 2022 : सोमवारी पार पडलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ग्रीन एनर्जीच्या (Green Energy) पर्यायांकडे स्विच करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. रिलायन्स इंडस्ट्रीज पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी एक नवीन गीगाफॅक्टरी उभारणार आहे, जिथे किफायतशीर आणि विश्वासार्ह पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं डिझाईन आणि उत्पादन केलं जाईल. या पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा वापर दूरसंचार, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) प्लॅटफॉर्मसाठी केला जाईल.

पॉवर इलेक्ट्रॉनिक्स पॉवर देण्यासाठी हाय व्होल्टेज आणि करंट्सच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. जागतिक स्तरावर कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्याच्या प्रक्रियेत हे एक महत्त्वाचे साधन मानले जाते."रिलायन्सने आतापर्यंत जे काही केले आहे त्यापेक्षा नवीन ऊर्जा व्यवसाय हा अधिक महत्त्वाकांक्षी, परिवर्तनशील आणि जागतिक व्याप्तीचा आहे,” अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी यावर बोलताना दिली.

चार गीगाफॅक्टरी"गेल्या वर्षी आम्ही गुजरातमधील जामनगर येथे धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स उभारण्याची घोषणा केली. येथे आम्ही अनुक्रमे फोटोव्होल्टेक सेल, एनर्जी स्टोरेज, ग्रॅनी हायड्रोजन आणि फ्युअल सेलसाठी ४ गिगा कारखाने सुरू करत आहोत,” असे मुकेश अंबानी म्हणाले. "आज मी पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी आणखी एक नवीन गीगाफॅक्टरी तयार करण्याची घोषणा करत आहे. किफायतशीर आणि विश्वासार्ह पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे मुख्य घटकांपैकी एक आहे," असेही ते म्हणाले. गीगाफॅक्टरीज हे मोठे उत्पादन संयंत्र असतात जे बॅटरी उत्पादन प्रक्रियेद्वारे किंवा इतर प्रणालींद्वारे हजारो गीगावॅट उर्जेचे एन्ड टू एन्ड उत्पादन करण्यास सक्षम आहेत.

वचन लवकरच पूर्ण करायचंय"जामनगरच्या न्यू एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टममध्ये ७५,००० कोटी गुंतवण्याचे आमचे वचन आम्ही लवकरच पूर्ण करू इच्छितो. तसेच कंपनी २०२५ पर्यंत २० गीगावॉट सौरऊर्जा निर्मिती क्षमता स्थापित करू इच्छित आहे. हे ग्रीन हायड्रोजनची पॉवर आणि एनर्जीची गरज पूर्ण करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजला २०२५ पर्यंत स्वतःला ग्रे हायड्रोजन वरून ग्रीन हायड्रोजन कंपनीमध्ये बदलायचे आहे. त्यासाठी खर्च आणि परफॉर्मन्स टार्गेट निश्चित करण्यात आलेलं आहे.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीव्यवसाय