Join us

Reliance च्या बोर्डाची बोनस शेअरला मंजुरी, गुंतवणूकदारांना १:१ फ्री शेअर मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 9:24 AM

Reliance Bonus Share : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरहोल्डर्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आरआयएलच्या संचालक मंडळानं भागधारकांना १:१ बोनस देण्यास मान्यता दिली आहे. पाहा काय होणार फायदा?

Reliance Bonus Share : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरहोल्डर्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आरआयएलच्या संचालक मंडळानं भागधारकांना १:१ बोनस देण्यास मान्यता दिली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी बोनस शेअर देण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचं जाहीर केलं होतं. आरआयएलने शेअर बाजाराला पाठवलेल्या पत्रात, पोस्टल बॅलेटद्वारे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळानं १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची शिफारस केली असल्याचं म्हटलंय.

कंपनीचे अधिकृत शेअर कॅपिटल १५ हजार कोटी रुपयांवरून ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावालाही संचालक मंडळानं मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे आरआयएलनं आपल्या भागधारकांना बोनस शेअरची घोषणा करण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी रिलायन्सनं २०१७, २००९ आणि १९९७ मध्ये शेअरहोल्डर्सना १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते, तर १९८३ मध्ये ३:५ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यात आले होते.

बोनस शेअर्स म्हणजे काय?

बोनस शेअर्स म्हणजे एखाद्या कंपनीनं आपल्या भागधारकांना दिलेले अतिरिक्त शेअर्स. हे शेअर्स कंपनीच्या रिझर्व्हमधून दिले जातात. जेव्हा जेव्हा कंपनी बोनस शेअर्स जारी करते, तेव्हा त्याच्या विद्यमान शेअर्सची संख्या वाढते. बोनस शेअर्सच्या घोषणेचा थेट फायदा भागधारकांना होणार आहे. बोनस इश्यू सहसा भागधारकांना रिवॉर्ड देण्याच्या आणि शेअर्सची लिक्विडिटी वाढविण्याच्या उद्देशानं कंपन्यांकडून केले जातात.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी