Join us

मुकेश अंबानींची गुंतवणूकदारांना मोठी भेट, बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्सला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 6:06 PM

Reliance Industries Bonus Issue: रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Reliance Industries Bonus Issue : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्सने गुरुवारी गुंतवणूकदारांना मोठी भेट दिली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स मंजूर करण्यात आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत याची घोषणा करण्यात आली होती.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या बोर्डाने आज, 5 सप्टेंबर रोजी 1:1 बोनस जारी करण्यास मान्यता दिली आहे. सप्टेंबर 2017 नंतर कंपनीची ही पहिली बोनस ऑफर आहे. प्रत्येक शेअरहोल्डरला आता प्रत्येक शेअर्ससाठी एक फ्री शेअर मिळेल. मात्र, रिलायन्सने अद्याप बोनस क्रेडिटची तारीख जाहीर केलेली नाही.

कंपनीचे भागभांडवल वाढलेरिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, बोर्डाने पात्र भागधारकांना प्रत्येकी 10 रुपयांचा एक शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, बोर्डाने अधिकृत भागभांडवल सध्याच्या 15,000 कोटींवरून 50,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानंतरही रिलायन्सचे शेअर घसरणीसह बंद झाले. यामागे तारखेचे कारण आहे. गुंतवणूकदार बोनस जारी करण्याच्या तारखेची वाट पाहत होते, जी अद्याप जाहीर झाली नाही.

बोनस शेअरचा नियम काय आहे?रिलायन्स इंडस्ट्रीजने यापूर्वी 2017, 2009 आणि 1997 मध्ये शेअरधारकांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते. 1983 मध्ये 3:5 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यात आले. जून 2024 अखेर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये प्रवर्तकांकडे 50.33 टक्के हिस्सा होता. या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना प्रति शेअर 10 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला होता. कंपनीने शेअरधारकांना बोनस शेअर्स बक्षीस देण्याची योजना जाहीर करण्याची ही पाचवी वेळ आहे. BSE डेटानुसार RIL स्टॉकने या वर्षात आतापर्यंत 16.9 टक्के परतावा दिला आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक