Reliance Industries Bonus Share : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी फोकसमध्ये आहेत. कामकाजादरम्यान कंपनीचे शेअर्स ३०५२.०५ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर आहेत. वास्तविक, आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक असून १:१ या प्रमाणात बोनस शेअर मंजूर होण्याची शक्यता आहे. अलीकडेच कंपनीनं आपल्या भागधारकांना प्रति शेअर एक बोनस शेअर देण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं मुकेश अंबानी यांनी एजीएमदरम्यान सांगितलं होतं.
सविस्तर माहिती काय?
मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मूल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्सनं यापूर्वी सप्टेंबर २०१७ मध्ये 'बोनस शेअर्स' जारी केले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजनं आता शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी, ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये कंपनीच्या भागधारकांना एकास एक या प्रमाणात बोनस समभाग देण्याची शिफारस संचालक मंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. सध्या कंपनीचं मार्केट कॅप २०,४८,५१९.७५ कोटी रुपये आहे.
काय म्हणाले होते अंबानी?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना कंपनी बोनस शेअर देण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रति शेअर एक बोनस शेअर जारी करण्याबाबत विचार केला जाईल, रिलायन्स जसजशी मोठी होत जाईल, तसतसा त्याचा फायदा आम्ही आमच्या भागधारकांनाही देतो, असंही ते म्हणाले होते. आरआयएलने यापूर्वी २०१७ आणि २००९ मध्ये भागधारकांना १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते.