Join us  

अंबानींची कंपनी खरेदी करणार महाराष्ट्रातील ही सोलार कंपनी; एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 4:19 PM

Mukesh Ambani Reliance Industries : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एकूण १२८ मेगावॅट क्षमतेची सौरऊर्जा बसवण्यासाठी कंपनीला देण्यात आलेल्या निविदांच्या अटींनुसार हा करार झाला आहे.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) रिलायन्स इंडस्ट्रीज MSEB सोलर ऍग्रो पॉवरकडून MSKVY नाईनटिन्थ सोलर SPV आणि MSKVY ट्वेन्टी सेकंड सोलर SPV मधील १०० टक्के हिस्सा खरेदी करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळानं (Reliance Industries) त्याच्या अधिग्रहणास मंजुरी दिली आहे. 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एकूण १२८ मेगावॅट क्षमतेची सौरऊर्जा बसवण्यासाठी कंपनीला देण्यात आलेल्या निविदांच्या अटींनुसार हा करार झाला आहे, असं कंपनीनं एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटलंय. एमएसईबी सोलर ऍग्रो पॉवरकडून संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अधिग्रहणानंतर ट्रान्झॅक्शन केलं जाईल. त्याचं संपादन एप्रिल २०२४ अखेर पूर्ण होणं अपेक्षित आहे. 

काय म्हटलंय ब्रोकरेजनं? 

ब्रोकरेज फर्म यूबीएसनं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सचं टार्गेट प्राईज ३००० रुपयांवरून ३,४०० रुपये प्रति शेअर केलं आहे. ब्रोकरेज फर्मनं शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तर देशांतर्गत ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी ३२१० रुपये टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. 

गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट 

शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स ०.३०% च्या वाढीसह २९०९.९० रुपयांवर पोहोचले. ४ मार्च २०२४ रोजी शेअरची किंमत ३,०२४.८० रुपये होती. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. या स्टॉकनं सहा महिन्यांत २४.१९% परतावा दिलाय, तर एका वर्षात २९.३१% ची वाढ दिसून आलीये. मुकेश अंबानी यांच्या कंपनीनं पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :महाराष्ट्रमुकेश अंबानीरिलायन्स