Mukesh Ambani: गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्थेबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ काही दावे करताना दिसत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते पुढील काहीच वर्षांत भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पार करू शकेल. अलीकडेच जगातील आघाडीचे अब्जाधीश असलेल्या अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केले होते. यानंतर आता लगेचच रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनीही भारतीय अर्थव्यवस्थेबाबत प्रतिक्रिया नोंदवताना मोठा दावा केला आहे.
भारत २०५० पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. तर २०३० पूर्वी भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्याच वेळी २०५० पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारत पुढील दशकात दर १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मध्ये १ ट्रिलियन डॉलर्स जोडण्यास सुरूवात करेल, असा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला होता. यानंतर आता मुकेश अंबानी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठा विश्वास व्यक्त केला आहे.
२०४७ पर्यंत भारत ४० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल
२०४७ पर्यंत भारत ४० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. हा अंदाज खरा ठरला तर येत्या २५ वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार १३ पटीने वाढेल. भारतीय अर्थव्यवस्थेच्या या विस्तारात स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि डिजिटलायझेशनचा सर्वात मोठा वाटा असेल, असे मुकेश अंबानी म्हणाले. अंबानी यांनी २०४७ चा उल्लेख केला आहे कारण तेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. मुकेश अंबानींचा हा अंदाज उद्योजक गौतम अदानी यांच्यापेक्षा जास्त आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या ३ ट्रिलियन डॉलर्सची आहे, परंतु २०४७ पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार ४० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल आणि भारत होईल. आतापासून २०४७ पर्यंतचा काळ अमृतकाल असल्याचे सांगत, या काळात देशाला आर्थिक विकास आणि संधींचा अभूतपूर्व विस्तार दिसेल, असे अंबानी यांनी नमूद केले.
तीन मोठ्या क्रांतीमुळे विकास होईल
येत्या काही दशकांमध्ये तीन मोठ्या क्रांती देशाच्या विकासाला चालना देतील - स्वच्छ ऊर्जा क्रांती, जैव ऊर्जा क्रांती आणि डिजिटल क्रांती. ते म्हणाले की स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि जैव ऊर्जा क्रांती आपल्याला ऊर्जा उत्पादन शाश्वत करण्यासाठी मदत करेल, तर डिजिटल क्रांतीमुळे ऊर्जा वापरामध्ये कार्यक्षमता वाढेल, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह या तिन्ही क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"