मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) एका नव्या सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ हॉटेल आणि रिसॉर्ट विकसित करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला त्यांच्या नवीन कंपनी रिलायन्स एसओयू (Reliance SOU) द्वारे गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बांधायचे आहेत.
काय आहे कंपनीचा प्लॅन?
रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे उपलब्ध असलेल्या तपशिलानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजची नवीन कंपनी हॉस्पिटॅलिटी उद्योगात प्रवेश करणार आहे. ते हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि सर्व्हिस अपार्टमेंट्स उभारणार आहेत. याद्वारे शॉर्ट टर्म लॉजिंग सुविधा पुरवली जाणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. रिपोर्टनुसार, कंपनी हाऊसबोटवरही लॉजिंग सुविधा विकसित करू इच्छित आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडियात नर्मदा नदीच्या काठावर आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी सुमारे ४ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. तसंच आतापर्यंत त्या ठिकाणी १० मिलियन लोकांनी भेट दिलीये.
टाटा समूहाचीही तयारी
टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनीनं यापूर्वीच सरदार सरोवर नर्मदा निगमसोबत (SSNNL) भागीदारी केली आहे. रिपोर्टनुसार, इंडियन हॉटेल्स कंपनी विवांता आणि जिंजर नावाच्या दोन प्रॉपर्टी लाँच करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, कंपनीनं संपूर्ण मालकीची उपकंपनी रिलायन्स एसओयू (RSOUL) सुरू केली आहे आणि तिच्या मदतीने ती व्यावसायिक मालमत्ता विकसित करू इच्छित आहे, असं स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजनं असं म्हटलंय आहे. परंतु कंपनी या मालमत्तांचे स्वत: व्यवस्थापन करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.