नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांनी अलीकडेच कंपनीच्या बोर्डात आपल्या तिन्ही मुलांचा समावेश केला आहे. आता एक मोठी माहिती समोर आली आहे. कंपनीच्या बोर्डात सामील झालेली अंबानींची तिन्ही मुले पगाराशिवाय काम करणार आहेत. त्यांना फक्त बोर्ड आणि समितीच्या बैठकींसाठी फी दिली जाईल.
कंपनीने त्यांच्या नियुक्तीवर शेअर होल्डर्सची मंजुरी घेण्यासाठी ठेवलेल्या प्रस्तावात ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी 2020-21 या आर्थिक वर्षापासून कोणताही पगार घेत नाहीत. ऑगस्टमध्ये झालेल्या एजीएममध्ये त्यांची मुले आकाश, अनंत आणि मुलगी ईशा यांना कंपनीच्या संचालक मंडळावर समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली होती. रिलायन्सने आता आपल्या शेअरहोल्डर्सना पोस्टाद्वारे पत्र पाठवून या तिन्ही नियुक्तींवर त्यांची मंजुरी मागितली आहे.
कोणाकडे कोणती जबाबदारी?दरम्यान, इशा अंबानी कंपनीचा रिटेल व्यवसाय रिलायन्स रिटेल सांभाळत आहे. तसेच, आकाश अंबानी टेलिकॉम व्यवसाय जिओचे प्रमुख आहेत. त्यांचे भाऊ अनंत अंबानी यांच्याकडे रिलायन्स ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी आहे.