Join us  

RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 8:46 AM

RIL Q2 Results: दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. पाहा कसं आहे अंबानींच्या कंपनीचं रिपोर्ट कार्ड.

RIL Q2 Results: दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) नफ्यात घट झाली आहे. परंतु, बाजाराच्या अपेक्षेपेक्षा ते चांगले राहिले आहे. सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा ५ टक्क्यांनी घसरून १६,५६३ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा १७,३९४ कोटी रुपये होता.

आरआयएलचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी वाढून २.३५ लाख कोटी रुपये झालं आहे. कामकाजातून मिळणाऱ्या महसुलात या तिमाहीत ०.२ टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदविण्यात आली. ती वाढून २.३५ लाख कोटी रुपये झाली.

रिलायन्सच्या मार्जिनमध्ये घसरण

ऑईल पासून दूरसंचारक्षेत्रापर्यंत पसरलेल्या समूहानं दुसऱ्या तिमाहीत ४३,९३४ कोटी रुपयांचा एबिटडा नोंदवला आहे. यात वार्षिक २ टक्क्यांची घसरण दिसून येते. एबिटडा मार्जिन ५० बेसिस पॉईंटनं घसरलं. ते १७ टक्क्यांपर्यंत खाली आलं. या तिमाहीत फायनान्स कॉस्ट मध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ती वाढून ६,०१७ कोटी रुपये (७१८ दशलक्ष डॉलर) झाली. याचं मुख्य कारण म्हणजे कर्जात झालेली वाढ आहे.

डिजिटल सेवा, अपस्ट्रीम व्यवसायात जोरदार वाढ

रिलायन्सनं डिजिटल सेवा आणि अपस्ट्रीम व्यवसायात जोरदार वाढ नोंदविली आहे. यामुळे प्रतिकूल ग्लोबल डिमांड-सप्लाय डायनॅमिक्सनं प्रभावित ओ२सी व्यवसायाच्या कमकूवत योगदान मोठ्या प्रमाणात भरून काढण्यास मदत झाली. "या तिमाहीत रिलायन्सनं पुन्हा एकदा आपल्या वैविध्यपूर्ण व्यवसाय पोर्टफोलिओची लवचिकता दाखवून दिली, याचा मला आनंद होत आहे," अशी प्रतिक्रिया यानंतर मुकेश अंबानींनी दिली.

समूहातील डिजिटल सेवा कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या करोत्तर निव्वळ नफ्यात २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तो ६,५३९ कोटी रुपये होता. तर, महसुलात वार्षिक आधारावर १८ टक्क्यांनी वाढ झाली असून तो ३७,११९ कोटी रुपये झाला. दरम्यान, दुसऱ्या तिमाहीत एबिटडाही १८ टक्क्यांनी वाढून १५,९३१ कोटी रुपयांवर पोहोचला. दरवाढ आणि ग्राहकांच्या संख्येमुळे या कालावधीसाठी ARPU वाढून १९५.१ रुपये झाला. दरवाढीचा संपूर्ण परिणाम येत्या दोन-तीन तिमाहीत दिसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी