मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीमध्ये बंपर कमाई केली आहे. या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ३७.९ टक्क्यांनी वाढून २० हजार ५३९ कोटी रुपये एवढा झाला आहे. तर या काळामध्ये कंपनीचा नफा ५२.२ टक्क्यांनी वाढून २.०९ लाख कोटी रुपये झाला आहे.
यापूर्वी जुलै ते सप्टेंबर या मागच्या तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा लाभ १५ हजार ४७९ कोटी रुपये होता. तर कंपनीचे उत्पन्न हे १.९१ लाख कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या याच तिमाहीमध्ये कंपनीने १४ हजार ८९४ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. जर त्याचं उत्पन्न १.२३ लाख कोटी रुपये होते. कंपनीच्या निकालांच्या हिशोबाने गेल्या तिमाहीच्या तुलनेत यावेळी कंपनीचा नफा ५ हजार ६० कोटी रुपयांनी वाढला आहे.
रिलायन्स जियो आणि रिलायन्स रिटेलने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये आतापर्यंतचे सर्वात उत्तम निकाल दिले आहेत. रिलायन्स आपल्या डिजिटल सेवांचा कारभार जियो प्लॅटफॉर्म लिमिटेड अंतर्गत करते. जियो प्लॅटफॉर्मचा शुद्ध लाभ वार्षिक आधारावर ८.९ टक्क्यांनी वाढून ३ हजार ७९५ कोटी रुपये झाला आहे. तर रिलायन्स रिटेलचा लाभ २३.४ टक्क्यांनी वाढून २ हजार २५९ कोटी रुपये एवढा झाला आहे.
डिसेंबर २०२१ च्या अखेरीपर्यंत रिलायन्स जियोच्या सब्स्क्रायबरची संख्या ४२.१० कोटी झाली आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये जियो नेटवर्कचे १ कोटी सब्स्क्रायबर वाढले आहेत. तर कंपनीची प्रत्येक ग्राहकाच्या माध्यमातून होणारी कमाईसुद्धा वाढली आहे.