Reliance Industries Q4 result: मार्केट कॅपच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं (RIL) शुक्रवारी ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत, कंपनीचा नफा वार्षिक आधारावर १९ टक्क्यांनी वाढून १९२९९ कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत १६२०३ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा १५७९२ कोटी रुपये होता.
त्याचप्रमाणे, चौथ्या तिमाहीत, कंपनीचं उत्पन्न तिमाही आधारावर २.१७ लाख कोटी रुपयांवरून २.१३ लाख कोटी रुपयांवर घसरले. तिमाही-दर-तिमाही आधारावर, कंपनीचा एबिटडा चौथ्या तिमाहीत ३५,२४७ कोटी रुपयांवरून ३८,४४० कोटी रुपया झाला. एबिटडा मार्जिन मागील तिमाहीत १६.२ टक्क्यांवरून १८.०५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
कंपनीचा ऑईल टू केमिकल (O2C) व्यवसायाचा महसूल चौथ्या तिमाहीत १.२८ लाख कोटी रुपयांवर घसरला आहे, जो मागील तिमाहीत १.४४ लाख कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे, त्रैमासिक आधारावर ऑइल टू केमिकल (O2C) व्यवसायाचा एबिटडा ११,८९१ कोटी रुपयांवरून १४,१९४ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. ऑइल टू केमिकल (O2C) व्यवसायाचे एबिटडा मार्जिन तिसऱ्या तिमाहीत ८.२ टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
रिलायन्स रिटेलचा नफा वाढला
रिलायन्स रिटेलनं मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात १२.९ टक्के वाढ नोंदवली आहे. आता कंपनीचा नफा २४१५ कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल १९.४२ टक्क्यांनी वाढून ६९,२८८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत ५८,०१९ कोटी रुपये होता. रिलायन्स रिटेलचा एबिटडा ३२.६ टक्क्यांनी वाढून ४,९१४ कोटी रुपये झाला आहे. कंपनीनं ९६६ नवीन स्टोअर्स सुरू केले आहेत.
जिओ फायनॅन्शिअल सर्व्हिसेसची सुरूवात करणार
“मला हे सांगण्यास आनंद होतोय की रिलायन्सनं डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि संघटित रिटेलमध्ये घेतलेल्या पुढाकारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत आहे. रिलायन्सचा हा उपक्रम भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनण्यास मदत करत आहे. या वर्षी आम्ही कंपनीची वित्तीय सेवा शाखा डिमर्ज करण्याची आणि जिओ फायनॅन्शिअल सर्व्हिसेस नावाची नवीन कंपनी म्हणून सूचीबद्ध करण्याची योजना आखली आहे. यामुळे आपल्या शेअरधारकांना आपल्या नव्या कंपनीच्या सुरूवातीपासून एक नव्या ग्रोथ प्लॅटफॉर्ममध्ये भागीदारी करण्याची संधी मिळेल,” असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी म्हणाले.