Join us

Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 1:21 PM

Reliance Industries Share Price : देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज अर्ध्या किमतीत पाहायला मिळत आहेत. यानंतर शेअरमध्ये तेजीही दिसून आली.

Reliance Industries Share Price : देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स (Reliance Industries Share Price Today) आज अर्ध्या किमतीत पाहायला मिळत आहेत. यामागचं कारण म्हणजे बोनस शेअर्स. शेअर बाजारात आज म्हणजेच २८ ऑक्टोबरला रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स एक्स बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करत आहेत. कंपनीनं एका शेअरवर एक शेअर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज १३३८ रुपयांच्या पातळीवर उघडला. हा शुक्रवारच्या बंदच्या तुलनेत ४९.६१ टक्क्यांनी कमी आहे. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २६५५.४५ रुपयांवर बंद झाला होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरवर १ शेअर बोनस म्हणून दिला जाणार असल्याचं म्हटलं होतं. कंपनीनं सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४ रोजी या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. यामुळेच शुक्रवारच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स निम्म्यावर आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, रिलायन्सच्या जुन्या भागधारकांच्या शेअर्सचं मूल्य कमी झालेलं नाही. आता त्याच पैशात त्यांना दुप्पट शेअर्स मिळाले आहेत.

... तर फायदा मिळणार नाही

रेकॉर्ड डेट ही ती तारीख आहे जेव्हा कंपनी आपले रेकॉर्ड बुक तपासते. अशा परिस्थितीत आज जर तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केले तर तुम्हाला बोनस इश्यूचा फायदा मिळणार नाही. कारण त्यांची किंमत निम्म्यावर आली आहे. 

का दिले जातात बोनस शेअर्स?

जेव्हा कंपन्यांना वाटतं की त्यांच्या शेअर्सची किंमत वाढली आहे. ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करणं टाळत आहेत, अशावेळी ते दोन मार्ग अवलंबतात. पहिला मार्ग म्हणजे बोनस शेअर्स देण्याचा आणि दुसरा शेअर स्प्लिटचा आहे. दोन्हीमध्ये शेअर्सच्या किमती कमी होतात. पण एकीकडे शेअर स्प्लिटमध्ये शेअर्सची फेस व्हॅल्यू कमी होते. त्याचबरोबर बोनस इश्यूमध्ये फेस व्हॅल्यूवर कोणताही परिणाम होत नाही.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्सशेअर बाजार