Join us

मुकेश अंबानी तेल व्यवसायात टाकणार मोठा डाव! दुबईतील टीम वर्षात परत बोलावली; काय आहे रिलायन्सचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 5:03 PM

reliance industries : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी तेल व्यवसायात मोठी योजना आखत आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी रिलायन्सने रशियासोबत दीर्घकालीन करार केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

reliance industries : वाढत्या इंधनदराच्या दरम्यान उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मोठं उचललं आहे. देशातील सर्वात व्हॅल्यूएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज तेल व्यवसायात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या ट्रेडिंग ऑपरेशन्सची पुनर्रचना करत आहे. यामध्ये दुबईतून कच्च्या तेल ट्रेडिंग टीम परत बोलावण्याचा समावेश आहे. रिलायन्स जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठे रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवते. या वर्षाच्या अखेरीस दुबईमधून क्रूड ट्रेडिंग टीम माघारी घेण्याची त्यांची योजना आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी रिलायन्सने रशियासोबत दीर्घकालीन करार केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे स्पॉट कार्गो खरेदी करण्याची गरज कमी झाली आहे.

एका सूत्राने सांगितले की, रिलायन्सने आता रशियासोबत क्रूड आयात करार केला आहे. याशिवाय मध्यपूर्वेतील बड्या उत्पादक देशांशीही त्याचे व्यवहार आहेत. त्यामुळे दुबईतील कर्मचाऱ्यांवर अधिक खर्च करण्यात अर्थ नाही. रिलायन्सने यासंदर्भातील ईमेलला प्रतिसाद दिला नाही. २०२१ मध्ये, रिलायन्सने तेल आणि शुद्ध इंधनाच्या व्यापारासाठी UAE मध्ये कार्यालय उघडण्याची घोषणा केली होती. एका वर्षानंतर मुकेश अंबानींच्या कंपनीने आपली क्रूड ट्रेडिंग टीम दुबईला पाठवली. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर दुबई हे रशियन तेल व्यापाराचे केंद्र म्हणून उदयास आले होते.

जामनगर रिफायनरीरिलायन्स आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ४० टक्के रशियाकडून आयात करते. जामनगरमधील रिलायन्सची रिफायनरी दररोज १४ लाख बॅरल तेलावर प्रक्रिया करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सच्या दुबईतील कार्यालयात सुमारे २० ट्रेडर्स आहेत. तीन-चार वगळता इतर सर्वांना मुंबईला बोलावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित लोकांनाही हळूहळू मुंबई मुख्यालयात आणले जाईल. याबाबत कंपनीने दुबईतील व्यापाऱ्यांना आधीच माहिती दिली आहे. पण कंपनीला आपला प्रोडक्ट ट्रेडिंग टीम दीर्घकाळ दुबईत ठेवायची आहे.

दुबई व्यतिरिक्त, रिलायन्सची ह्यूस्टन आणि लंडनमध्ये देखील व्यापार कार्यालये आहेत. कंपनी लंडनमध्ये आपली टीम वाढवण्याचा विचार करत आहे. गेल्या तिमाहीत रिलायन्सने आपला पेट्रोकेमिकल व्यापार दुबईहून मलेशियाला हस्तांतरित केला होता. मलेशियामध्ये त्याची उत्पादन सुविधा आहे. रिलायन्सच्या मलेशियामध्ये २ कंपन्या आहेत. यामध्ये इंटिग्रेटेड पॉलिस्टर आणि टेक्सटाईल कंपनी रेक्रॉन आणि आरपी केमिकल्सचा समावेश आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सतेल शुद्धिकरण प्रकल्प