Join us

रिलायन्सची मोठी खेळी! देशातील अनेक 'बिग बाजार' आज बंद, उद्यापासून दिसणार नवं रुप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 16:54 IST

देशातील दुसरी सर्वात मोठी रिटेलर कंपनी असलेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीनं आज आपले बहुतांश ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरचं काम बंद केलं आहे.

नवी दिल्ली-

देशातील दुसरी सर्वात मोठी रिटेलर कंपनी असलेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीनं आज आपले बहुतांश ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरचं काम बंद केलं आहे. कंपनीचे बहुतांश 'बिग बाजार' स्टोअर आज बंद असल्याचं दिसून आलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वो मुकेश अंबानी यांनी फ्यूचर ग्रूपची मालकी प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

फ्यूचर ग्रूप गेल्या काही महिन्यांपासून आपल्या अनेक स्टोअर्सचं भाडं देण्यास असमर्थ ठरत होती. आता रिलायन्स इंडस्ट्री किशोर बियाणी यांच्या नेतृत्त्वाखालील फ्यूचर ग्रूपच्या अनेक रिटेल स्टोअरचं रिब्रँडिंग करणार आहे. ज्या स्टोअर्सचं भाडं देण्यास फ्यूचर ग्रूप असमर्थ ठरला आहे अशा सर्व स्टोअर्सचा ताबा आता रिलायन्स घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीकडून फ्यूचर ग्रूपच्या कर्मचाऱ्यांना नोकरीच्या ऑफर्स देखील येऊ लागल्या आहेत. 

आज बंद होते अनेक 'बिग बाजार' स्टोअर्सखरंतर रविवार म्हटलं की 'बिग बाजार'मध्ये खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पण आज फ्यूचर ग्रूपचे अनेक 'बिग बाजार' स्टोअर बंद असल्याचं दिसून आलं आहे.  तसंच कंपनीच्या वेबसाइटवरही ग्राहकांना ऑर्डर देता येत नाहीय. वेबसाइट सुरू करताच संबंधित संकेतस्थळ अपग्रेड करण्याचं काम सुरू आहे असा मेसेज दाखवत आहे. त्यामुळे 'बिग बाजार'चं उद्यापासून नवं रुपडं पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

कंपनी काय म्हणाली?फ्यूचर ग्रूप आणि रिलायन्स इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांसोबत यासंबंधिची माहिती विचारण्यासाठी संपर्क साधण्यात आला असता दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याआधी शनिवारी फ्यूचर ग्रूपनं स्टॉक एक्चेंजमध्ये कंपनी आपले व्यवहार कमी करणार असल्याचं म्हटलं होतं. दोन दिवस 'बिग बाजार'चे स्टोअर्स काही कारणासाठी बंद असणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

टॅग्स :बिग बाजाररिलायन्समुकेश अंबानी