देशात पहिल्यांदा फोर जी लाँच करणाऱ्या रिलायन्स जिओला काल मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. काल मुंबई, ठाणे परिसरातील रिलायन्स जिओच्या ग्राहकांना ८ तास इंटरनेट, मोबाईल सेवेपासून दूर रहावे लागले होते. रिलायन्सचे नेटवर्क ठप्प झाले होते. यामुळे रिलायन्स जिओने मोठा निर्णय घेतला आहे.
एका दिवसात आठ तास सेवा ठप्प झाल्याने त्याची भरपाई दोन दिवस मोफत सेवा देऊन करण्यात येणार आहे. ही दोन दिवस फ्री सेवा Reliance Jio च्या त्याच ग्राहकांना मिळणार आहे, ज्यांना काल आठ तास त्रास सहन करावा लागला आहे. बाकी राज्यातील ग्राहकांना मोफत सेवा दिली जाणार नाही. याचा अर्थ ज्या लोकांना इंटरनेट आणि कॉलिंग सेवेचा लाभ घेण्यास समस्या आली त्यांना त्यांच्या व्हॅलिटिडीवर दोन दिवस वाढवून मिळणार आहेत.
जिओ युजर्सना कंपनीकडून याबाबत मेसेज आले आहेत. यामध्ये दोन दिवस वाढीव सेवा दिली जाणार असल्याचे म्हटले आहे. याआधी २०२१ मध्ये देखील जिओने ग्राहकांना दोन दिवसांची फ्री सेवा दिली होती. मात्र, हा फायदा केवळ प्रभावित झालेल्या युजर्सनाच मिळाला होता. दोन वर्षांत असे दुसऱ्यांदा घडले आहे.