Join us

Reliance Jio 5G : जिओ 5G बाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा, गुगलच्या मदतीनं लाँच होणार स्वस्त 5G फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 2:51 PM

Reliance Jio 5G AGM : पाहा तुमच्या शहरात कधीपासून मिळणार सेवा. 5G नेटवर्कसाठी जिओ खर्च करणार २ लाख कोटी.

Reliance Jio 5G AGM : रिलायन्स जिओची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. कंपनीच्या ४५ व्या एजीएमला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संबोधित केलं. तसंच रिलायन्स जिओच्या 5G सेवांबाबतही मोठी घोषणा करण्यात आली.

दरवर्षी ऑगस्ट महिन्यात रिलायन्स जिओच्या एजीएमचं आयोजन करण्यात येतं. २०१६ मध्ये झालेल्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांन जिओ लाँच केलं होतं. त्यानंतर आता ४० कोटींपेक्षा अधिक युझर्ससह जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. अंबानी यांनी आजच्या या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, दिवाळीपासून रिलायन्स जिओ आपली 5G सेवा सुरू करणार असल्याची घोषणा अंबानी यांनी यावेळी केली.

एजीएमदरम्यान मुकेश अंबानी यांनी चिपसेट उत्पादक क्वालकॉम, इंटेल, सॅमसंग, मेटा, नोकिया आणि गुगलसह करार केल्याचीही घोषणा केली. तसंच गुगलसह स्वस्त 5G फोनदेखील लाँच केला जामार असल्याचं त्यांनी सांगितलं. “आज ग्राहकांची संख्या ४२.१ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. जिओचे ग्राहक दर महिन्याला सरासरी २० जीबी डेटाचा वापर करतात. हे संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. जिओ फायबर ११ लाख किलोमीटरचा परिसर कव्हर करत आहे. देशात प्रत्येक तीन पैकी दोन ग्राहक जिओ फायबरचा वापर करताय,” असंही अंबानी म्हणाले. जिओ 5G द्वारे मोबाईल ब्रॉडबँड सेवा अतिशय उत्तम असेल. लवकरच १०० पेक्षा अधिक शहरांमध्ये जिओ 5G सेवा सुरू करेल. १०० दशलक्ष घरांना 5G द्वारे स्मार्ट बनवायचं असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मेट्रो सिटींमधून सुरूवात

5G नेटवर्कसाठी रिलायन्स जिओ २ लाख कोटींचा खर्च करणार आहे. तसंच ही सेवा सर्वप्रथम मेट्रो सिटीमध्ये लाँच केली जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत प्रत्येक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली जाणार आहे. कंपनी वायर आणि वायरलेस सेवांचा वापर करून संपूर्ण देशात 5G सुरू करेल.

रिलायन्स जिओनं स्टँड अलोन 5G सेवांचीही घोषणा केली आहे. याचाच अर्थ कंपनीला 5G सेवांसाठी 4G च्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करावा लागणार नाही. जिओनं उत्तर कव्हरेज मिळावं यासाठी प्रीमिअम ७०० मेगाहर्ट्झ बँड खरेदी केला आहे. हा बँड 5G सेवांसाठी उत्तम मानला जातो. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता येथे दिवाळीच्या सुमारास जिओची 5G सेवा सुरू केली जाईल.

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानी