Join us  

Reliance Jio IPO: कधी लिस्ट होणार मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ? ९.३ लाख कोटी असू शकतं व्हॅल्युएशन, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 2:01 PM

रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकीची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या आयपीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Jio IPO News: रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकीची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या आयपीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कंपनीचा आयपीओ २०२५ मध्ये येऊ शकतो. ब्रोकरेज हाऊस जेफरीजच्या मते कंपनीचं मूल्यांकन ९.३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतं.

रिलायन्सच्या शेअर्सची स्थिती

११ जुलै रोजी शेअर केलेल्या नोटमध्ये कंपनीनं म्हटलं की, जिओच्या आयपीओचं लिस्टिंग ११२ अब्ज डॉलर्सवर होऊ शकतं. ब्रोकरेज हाऊस रिलायन्सच्या शेअर्सवरही बुलिश आहे. रिलायन्सच्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांपर्यंतची वाढ झाल्याचं ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं आहे. जेफरीजच्या नोट्सनुसार, आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित असेल.

जेफरीजनं दिलं बाय रेटिंग

जेफरीजनं रिलायन्स इंडस्ट्रीजला दिलेलं 'बाय' रेंटिंग कायम ठेवलं आहे. याशिवाय ब्रोकरेज हाऊसनं ३५८० रुपयांचे टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे. जे बुधवारच्या बंदच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक आहे. जानेवारीपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किमतीत २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर निफ्टी ५० मध्ये या काळात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ३१७८ रुपयांच्या पातळीवर उघडला. गुरुवारी कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक ३१८२.६५ रुपये होता. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३२१७.९० रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २२२१.०५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २१,५३,५२४.६४ कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानीइनिशिअल पब्लिक ऑफरिंग