रिलायन्स जिओनं एन्ट्री केल्यानंतर सर्वच दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. रिलायन्स जिओनं देशभरात आता 5G सेवाही सुरू केल्या आहेत. आता रिलायन्स जिओ आणखी एक मोठी डील करणार आहे. दूरसंचार क्षेत्रात आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी मुकेश अंबानी आता नोकियाशी करार करणार आहेत. रिलायन्स जिओ आणि नोकिया यांच्यात भारतात हाय स्पीड 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी करार केला जाणार आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये 1.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा करार होणार आहे. या डील अंतर्गत, रिलायन्स नोकियाकडून 5G डिव्हाइस खरेदी करेल.
दोन्ही कंपन्यांमधील हा करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या डीलनंतर जिओच्या युझर्सना 10 पट अधिक जलद इंटरनेटची सुविधा मिळेल. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, फिनलंडमधील हेलसिंकीजवळ नोकियाच्या मुख्यालयात हा करार केला जाऊ शकतो. वास्तविक रिलायन्सला या वर्षाच्या अखेरीस भारतात पूर्ण क्षमतेनं हाय स्पीड 5G नेटवर्क सुरू करायचे आहे. म्हणूनच कंपनीनं नोकियाच्या 5G उपकरणांसाठी करार केला आहे. नोकियाच्या आधी रिलायन्सने स्वीडनची कंपनी एरिक्सनसोबत 5G उपकरणांसाठी करारही केलाय.
जागतिक बँकांकडून कर्ज घेणार
कंपनीने या करारासाठी एचएसबीसी, जेपी मॉर्गन आणि सिटीग्रुप सारख्या जागतिक बँकांकडून कर्जाची योजना आखली आहे. या डीलनंतर जिओ ग्राहकांना हायस्पीड इंटरनेटची चांगली सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. 2016 मध्ये लाँच झाल्यापासून, जिओनं आपल्या ऑफर्सच्या आधारे मोठा ग्राहकवर्ग तयार केला आहे. सध्या जिओचे 43.52 कोटी युझर्स आहेत. तर एअरटेलचे 37.09 कोटी, व्होडाफोन आयडियाचे 23.37 कोटी आणि BSNL चे 10.28 कोटी युझर्स आहेत.