Join us

Reliance जिओ 'टॉपर', एअरटेल दुसऱ्या स्थानी; किती आहेत टेलिकॉम ग्राहक, कोणाचा किती शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 2:27 PM

दूरसंचार नियामक ट्रायनं सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. रिलायन्स जिओनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे.

देशातील दूरसंचार ग्राहकांच्या संख्येत फेब्रुवारीमध्ये महिनाभरापूर्वीच्या तुलनेत ०.३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ती वाढून ११९.७ कोटी झाली. दूरसंचार नियामक ट्रायनं सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) अहवालानुसार शहरी टेलिफोन ग्राहकांची संख्या फेब्रुवारीमध्ये ०.४० टक्क्यांनी वाढून ६६.३७ कोटी झाली आहे. त्याच वेळी, ग्रामीण ग्राहकांची संख्या ०.३४ टक्क्यांनी वाढून ५३.१३ कोटी झाली. ट्रायच्या मासिक ग्राहक अहवालानुसार, ब्रॉडबँड ग्राहकांची एकूण संख्या जानेवारीच्या अखेरीस ९१.१० कोटींवरून फेब्रुवारीच्या अखेरीस ९१.६७ कोटी झाली आहे. 

टॉप ५ मध्ये कोण? 

ब्रॉडबँड मार्केटमध्ये पहिल्या पाच सर्व्हिस प्रोव्हायडर्सचा वाटा ९८.३५ टक्के आहे. यामध्ये रिलायन्स जिओ (५२.२ टक्के), भारती एअरटेल (२९.४१ टक्के), व्होडाफोन आयडिया (१३.८० टक्के), बीएसएनएल (२.६९ टक्के) आणि एट्रिया कन्व्हर्जन्स (०.२४ टक्के) यांचा समावेश आहे. अहवालात असंही म्हटलंय की फेब्रुवारीमध्ये लँडलाईन आणि मोबाइल दोन्ही सेवांमध्ये सर्व मंडळांमध्ये ग्राहकांची संख्या वाढली आहे. फेब्रुवारीअखेर लँडलाइन ग्राहकांची संख्या १.७३ टक्क्यांनी वाढून ३.३१ कोटी झाली आहे. 

वायरलेस ग्राहक किती वाढले? 

ट्रायनं दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बीएसएनएल, एमटीएनएल आणि एपीएसएफएल यांचा लँडलाइन मार्केटमध्ये एकूण २८.१८ टक्के वाटा आहे. दूरसंचार नियामकाच्या मते, वायरलेस ग्राहकांची एकूण संख्या फेब्रुवारी महिन्यात ०.३४ टक्क्यांनी वाढून ११६.४६ कोटी झालीये.

टॅग्स :रिलायन्स जिओएअरटेलबीएसएनएल