Reliance Mukesh Ambani: रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांना सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनल म्हणजेच SAT कडून मोठा दिलासा मिळाला आहे. रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडच्या शेअर्समध्ये कथित फेरफार संबंधित प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, नवी मुंबई SEZ आणि मुंबई SEZ विरुद्ध SAT ने बाजार नियामक सेबीचा 2021 चा आदेश रद्द केला आहे.
जानेवारी 2021 मध्ये सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीजवर 25 कोटी रुपये आणि अंबानींना 15 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच, सेबीने नवी मुंबई सेझला 20 कोटी रुपयांचा दंड भरण्यासही सांगितले होते. आरआयएल आणि इतर संस्थांसह अंबानी यांनी या आदेशाला सॅटसमोर आव्हान दिले होते. सोमवारी न्यायमूर्ती तरुण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, सेबीचा 2021 चा आदेश रद्द करण्यात आला आहे. दंड सेबीकडे जमा झाला असेल, तर तो अपीलकर्त्यांना परत करावा.
काय आहे प्रकरण?
आदेशाची सविस्तर प्रत अद्याप आलेली नाही. दरम्यान, हे प्रकरण नोव्हेंबर 2007 मध्ये रोख आणि फ्युचर्स विभागातील RPL शेअरच्या विक्री आणि खरेदीशी संबंधित आहे. रिलायन्सने RPL मधील सुमारे 5 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता. ही समूहाची एक लिस्टेड उपकंपनी होती, जी नंतर 2009 मध्ये RIL मध्येच विलीन झाली.
रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ
सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज वाढीसह 2421.00 रुपयांवर व्यवहार करत होते. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 2445 रुपयांवर पोहोचले होते. विशेष म्हणजे, आज कंपनीचे शेअर्स 2440.05 रुपयांवरच उघडले. कंपनीचे मार्केट कॅप 16,37,633.61 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)