ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - रिलायन्सची तीन लाख 30 हजार कोटींची उलाढाल असून 30 हजार कोटींचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी दिली आहे. सर्वसाधारण बैठकीत बोलताना मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. मुकेश अंबानी यांनी भाषणाला सुरुवात केली असता धीरुभाई अंबानींचा उल्लेख करताना भावूक झालेले दिसले. जिओमुळे रिलायन्सला खूप फायदा झाला असून 170 दिवसात जिओचे 10 कोटी ग्राहक झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिओने गेल्या दहा महिन्यात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. दर सेकंदाला 7 ग्राहक जिओशी जोडले गेले असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. फेसबूक, व्हाट्सअॅपपेक्षाही जास्त गतीने लोक जिओशी जोडले गेले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जिओमुळे महिन्याला 120 कोटी जीबी डाटा वापरण्यात आला असून, मोबाईल डाटा वापरात भारताने चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकलं असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.
Want to dedicate these 40 yrs of achievement&records to only one person, founder chairman D Ambani & am grateful to my mother: Mukesh Ambani pic.twitter.com/BwFyEFnSad
— ANI (@ANI_news) July 21, 2017
सहा महिन्यात डाटाचा वापर सहा टक्क्यांनी वाढला. सुरुवातीला मोफत सुविधा दिल्यानंतर पेड ग्राहक मिळणार नाहीत असा दावा करण्यात आला होता, मात्र हे दावे खोटे ठरलं असून जिओचे 10 कोटीहून जास्त पेड ग्राहक आहेत अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. अनेकांनी 309+ चा प्लान घेण्यास पसंती दाखवली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यावेळी रिलायन्सने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला असून विशेष म्हणजे हा फोन मोफत विकत मिळणार आहे. रिलायन्स जिओनं प्रतिस्पर्ध्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन विकत घेण्यासाठी 1500 रुपयांचं सेक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार असून तीन महिन्यानंतर सर्व पैसे परत मिळणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे.
जिओ स्मार्टफोनमध्ये 22 भाषा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि युएसबीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. धन धना धन प्लान जिओ फोनमध्ये 153 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे जिओ फोन टीव्हीसोबतही कनेक्ट करता येणार आहे. जिओ फोन टीव्ही केबल फक्त 309 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच जिओ फोन टीव्हीसोबत कनेक्ट केल्यानंतर तीन ते चार तासांचे व्हिडीओ पाहणं शक्य होणार आहे.
ज्यांना हे दर परवडणार नाहीत त्यांच्यासाठी दोन छोटे प्लान उपलब्ध आहेत. दोन दिवसांसाठी 24 रुपये तर आठवड्याभरसाठी 54 रुपयांचा प्लान विकत घेता येऊ शकतो.
12 ऑगस्टपासून जिओ फोनची टेस्टिंग सुरु होणार असून 24 ऑगस्टपासून प्री बूकिंग सुरु होणार आहे. प्रथम बूकिंग करतील त्यांनाच हा स्मार्टफोन मिळणार असून सप्टेंबरपर्यंत फोन हाती येईल अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे.