Join us

30,000पेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलायन्स देणार दोन टप्प्यांत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 5:37 PM

कंपनीनं रिलायन्स फाउंडेशन, रिलायन्स रिटेल, जिओ, रिलायन्स लाइफ सायन्सेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फॅमिलीच्या 6,00,000 कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधात लढण्याच्या योजनेवर काम करण्यासाठी तैनात केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांसाठी रुग्णालयाच्या वेगळ्या कक्षाची निर्मिती केल्यानंतर रिलायन्सनं आता 30,000पेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.ज्यांना दरमहा 30,000 पेक्षा कमी वेतन आहे, त्यांना महिन्यातून दोनदा पगार मिळणार आहे. कमी पगारदारांना सध्याच्या दिवसांत आर्थिक मदत करण्यासाठी रिलायन्सनं हा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्लीः देशभरात कोरोनानं धुडगूस घातल्यानंतर केंद्र सरकारनंही सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाग्रस्तांसाठी रुग्णालयाच्या वेगळ्या कक्षाची निर्मिती केल्यानंतर रिलायन्सनं आता 30,000 पेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना दरमहा 30,000 पेक्षा कमी वेतन आहे, त्यांना महिन्यातून दोनदा पगार मिळणार आहे. म्हणजे 30 हजारपेक्षा कमी पगार असलेल्या व्यक्तींनी निम्मा पगार 15 तारखेला आणि निम्मा पगार महिन्याच्या शेवटी मिळेल. कमी पगारदारांना सध्याच्या दिवसांत आर्थिक मदत करण्यासाठी रिलायन्सनं हा निर्णय घेतला आहे. लाइव्ह मिंटनं अशा आशयाचं वृत्त दिलं आहे. चीनच्या वुहान शहरात जन्मलेल्या या प्राणघातक विषाणूने जगभरात 10000हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. भारतात आतापर्यंत जवळपास 500हून कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.कंपनीनं रिलायन्स फाउंडेशन, रिलायन्स रिटेल, जिओ, रिलायन्स लाइफ सायन्सेस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फॅमिलीच्या 6,00,000 कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधात लढण्याच्या योजनेवर काम करण्यासाठी तैनात केले आहे. कर्मचारी घरी बसले असले तरी कंपनी कंत्राटी आणि कायमस्वरूपी असलेल्या कामगारांना पगार देणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स जिओ नेटवर्कसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळता इतरांना वर्क फ्रॉम होम करण्याचाही सूचना केल्या आहेत. 

Coronavirus: मुकेश अंबानी मदतीला धावले; अवघ्या दोन आठवड्यांत कोरोनाबाधितांसाठी रुग्णालय उभारले

रिलायन्स कंपनीनं मुंबई महापालिकेच्या मदतीनं कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सेव्हन हिलमध्ये 100 बेड्सचं विलगीकरण कक्ष तयार केलं असून, मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. कोरोनाच्या विरुद्धच्या सामूहिक लढाईत आरआयएलने आपल्या कर्तव्याचे पालन करत 24x7 देशाच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सिद्ध केले आहे. आरआयएलने यापूर्वीच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात व्यापक, निर्णायक भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता त्याला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असंसुद्धा कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे.  या केंद्रावर निगेटिव्ह प्रेशर रूम तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कोरोनाची बाधा होणार नाही आणि बाधितांची संख्या रोखण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कंपनीनेच पत्रकाद्वारे दिली आहे. सर्व बेड्स हे आवश्यक साहित्यांसह उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डायलॅसिस मशिन आणि पेशंट मॉनिटरिंग साहित्यही उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स