Join us

₹२५५ चा शेअर आला १३ ₹वर, ‘या’ कंपनीने घेतले २ कोटी शेअर्स; गुंतवणूकदारांना दिसला आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 1:59 PM

गेल्या महिनाभरात या कंपनीने सुमारे १६ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

Reliance Power Share: शेअर बाजारात चढ-उतार दिसून येत आहे. काही कंपन्या गुंतवणूकदारांना मालामाल करत असून, काही कंपन्यांमुळे गुंतवणूकादारांचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच एका कंपनीने गुंतवणूकदारांना पार रडकुंडीला आणल्याचे बोलले जात आहे. एकेकाळी २५५ रुपयांवर व्यवहार करत असलेला चक्क अवघ्या १३ रुपयांवर आला. मात्र, एक कंपनी मदतीला धावून आली आणि या कंपनीचे २ कोटींहून अधिकचे शेअर घेतले. यामुळे गुंतवणूकदारांना आशेचे नवीन किरण दिसू लागल्याचे म्हटले जात आहे. 

ही कंपनी आहे अनिल अंबानी यांची Reliance Power. या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून येत आहे. मागील सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी हालचाल झाली. याचे कारण होते ब्लॉक डील. या डीलद्वारे रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची खरेदी-विक्री करण्यात आली. Hurti Private Limited ने रिलायन्स पॉवरचे २,२४,५६,१८५ शेअर्स १४.५९ रुपयांच्या सरासरी किमतीत विकत घेतले आणि १४.६३ च्या सरासरी किमतीने २,२१,१५,१५९ शेअर्स विकले. यासह Qi सिक्युरिटीजने रिलायन्स पॉवरचे २,१०,१३,०६४ शेअर्स १४.५६ रुपयांच्या सरासरी किमतीत खरेदी केले. १४.५८ रुपयांच्या सरासरी किमतीने २,२५,०१,८६४ शेअर्स विकले.

एका महिन्यात १६ टक्क्यांचा दिला परतावा

रिलायन्स पॉवर या शेअरने गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांना १६.२५ टक्क्यांचा परतावा दिला आहे. आताच्या घडीला रिलायन्स पॉवरचा शेअर १५.४० रुपयांवर व्यवहार करत आहे. रिलायन्स पॉवरने आपली उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या कर्जाची पुर्तता करण्यासाठी कर्जदारांना एक नवीन प्रस्ताव दिला आहे. या अंतर्गत १२०० कोटी रुपयांचे वन टाइम सेटलमेंट ऑफर देण्यात आली आहे. कर्ज देणाऱ्यांमध्ये अॅक्सिस बँक, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनबी, कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत कंपनीचे थकित कर्ज सुमारे २२०० कोटी रुपये होते.

दरम्यान, रिलायन्स पॉवरच्या शेअरबाबत बोलायचे तर सन २००८ च्या सुमारास २६१ रुपयांपर्यंत गेला होता. मात्र, या स्टॉकमध्ये आतापर्यंत सुमारे ९८ टक्के घसरण झाली आहे. एका वर्षाच्या कालावधीनंतरही हा शेअर ७.७५ टक्के वाढला.  

टॅग्स :शेअर बाजाररिलायन्स