Join us  

Future Group: ₹२ शेअर असलेली कंपनी खरेदीसाठी अंबानी-अदानी आमने-सामने; कोट्यवधी रुपयांचे आहे कर्ज! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 1:13 PM

Future Group: अंबानी आणि अदानी यांचे नाव खरेदीदारांमध्ये येताच कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागल्याचे सांगितले जात आहे.

Future Group: जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेले दोन दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी एका कंपनीच्या खरेदीसाठी आमने-सामने आल्याचे सांगितले जात आहे. रिलायन्स समूह आणि अदानी समूह एका कंपनीच्या खरेदीसाठी इच्छुक असून, या कंपनीच्या अधिग्रहणासाठी तब्बल ४९ कंपन्या स्पर्धेत असल्याचे सांगितले जात आहे. या कंपनीचा शेअर २ रुपयांवर व्यवहार करत असून, अंबानी-अदानी यांचे नाव अधिग्रहणाच्या यादीत आल्यानंतर या कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागल्याचे सांगितले जात आहे. 

कोट्यवधी रुपयांचे कर्ज असलेल्या फ्युचर रिटेलच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी रिलायन्स रिटेल, जिंदाल पॉवर आणि अदानी समूहासह इतर कंपन्या आखाड्यात उतरल्या आहेत. एकूण ४९ कंपन्यांनी फ्युचर रिटेलच्या मालमत्ता खरेदीस इच्छुक असल्याचे इरादापत्र सादर केले आहे.बिग बझार, फूड बझार, इझी डे आणि फूडहॉल अशा नावांनी देशभरात ४३० शहरांमध्ये एके काळी १,५०० हून अधिक विक्री दालनांची साखळी विणणाऱ्या किशोर बियाणी प्रवर्तित फ्युचर रिटेलच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सध्या ‘नादारी व दिवाळखोरी संहिते’नुसार सुरू आहे. 

विक्रीसाठी पुन्हा बोली मागवल्या होत्या

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या किराणा व्यवसायातील कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज व फ्लेमिंगो समूह यांनी संयुक्त भागीदारीत स्थापित केलेली कंपनी पुन्हा एकदा फ्युचर रिटेलच्या मालमत्ता खरेदीसाठी इच्छुक असल्याचा अर्ज सादर केला आहे. फ्युचर रिटेलच्या कर्जदात्या बँका आणि अन्य देणेकऱ्यांनी कंपनीच्या मालमत्ता विभागून त्यांच्या विक्रीसाठी पुन्हा बोली मागवल्या होत्या. फ्युचर रिटेलच्या कर्जदात्यांनी २३ मार्च रोजी पुन्हा नव्याने अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला. ७ एप्रिल २०२३ ही इरादापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख होती. 

दरम्यान, कंपनीच्या मालमत्ता व्यवसाय चालविणाऱ्या विविध पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. स्वारस्य असणारी कंपनी ही एक तर फ्यूचर रिटेलवर तिच्यासह, तिच्या उपकंपन्यांच्या सर्व भागभांडवलाची संपूर्णपणे मालकी मिळवून शकतील, अथवा विभाजित पाचपैकी एक वा अधिक मालमत्तांची खरेदी करू शकतील. दुसरीकडे, २ रुपयांवर व्यवहार करत असलेल्या फ्युचर रिटेलचा तेजीत आल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :रिलायन्सअदानीमुकेश अंबानीगौतम अदानी