मुंबई : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या फ्युचर ग्रुपला बाहेर काढण्याचे सर्व मार्ग खुंटल्याने अखेर फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी यांनी आपला वाटा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेलला विकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच याची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते.
गेल्या तीन दशकांपासून फ्युचर ग्रुपची धुरा सांभाळणाऱ्या किशोर बियाणी यांनी फ्युचर रिटेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीमधील आपले समभाग मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेलला विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आपला वाटा विकण्यासाठी बियाणी यांच्यासमोर अन्य दोन प्रेमजी इन्व्हेस्टमेंट्स आणि समारा कॅपिटल ही नावेही होती. मात्र या दोन्ही संस्थांबरोबर त्यांची चर्चा निष्फळ झाल्याने त्यांना रिलायन्स रिटेल शिवाय पर्याय राहिला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार बियाणी हे आपल्या नियंत्रणामधील फ्युचर रिटेलवरील हक्क सोडणार आहेत. यामध्ये बिगबझार, एफबीबी, फुड हॉल आणि सेंट्रल यांचा समावेश आहे. फ्युचर सप्लाय चेन सोल्युशन्स आणि फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स या कंपन्यांची विक्रीही रिलायन्स इंडस्ट्रीजला करण्यात येणार आहे. यानंतर बियाणी यांच्याकडे केवळ फ्युचर ग्रुपचा एफएमसीजी बिझनेस व काही छोट्या कंपन्या उरणार आहेत. बियाणी यांनी सन २०१२ मध्येच पॅँटलून रिटेल चेनची विक्री आदित्य बिर्ला ग्रुपला केलेली आहे.
फ्युचर रिटेलने आपल्यावरील कर्ज चुकविण्याचा तसेच कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. जानेवारी महिन्यामध्ये कंपनीने डॉलर बॉण्ड्सच्या माध्यमातून ५०० दशलक्ष डॉलर उभारले. त्यानंतर खर्च कमी करण्यासाठी १७७ छोटी स्टोअर्स बंद केली. मात्र तरीही कर्ज वाढतच चालल्याने विक्रीचा निर्णय घेतला.कर्जाचे प्रमाण वाढतेचफ्युचर ग्रुपच्या नोंदणीकृत असलेल्या सहा कंपन्यांवरील कर्जाचा बोजा वाढत असल्याचे इकरा या पतमापन संस्थेने सांगितले आहे. मार्च, २०१९मध्ये या कंपन्यांवर असलेले ११,४६३ कोटी रुपयांचे कर्ज वाढून सप्टेंबर, २०१९मध्ये १२,७७८ कोटी रुपयांवर गेले आहे. या कर्जफेडीसाठी काही उपाय निघत नसल्याने अखेरीस फ्युचर ग्रुपने आपला हा व्यवसाय विकून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.