स्टार इंडिया आणि वायकॉम १८ च्या विलीनीकरणानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज डिस्ने+हॉटस्टारला (Disney+ Hotstar) एकमेव स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणून कायम ठेवू शकते. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, जिओ सिनेमा (Jio Cinema) डिस्ने+हॉटस्टारमध्ये विलीन होणार आहे. यानंतर जॉइंट प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारचा कंटेन्ट पाहता येईल.
डिस्ने+हॉटस्टारचे किती डाउनलोड?
वॉल्ट डिस्नेची स्टार इंडियाच्या मालकीची स्ट्रीमिंग सर्व्हिस डिस्ने+हॉटस्टारचे गुगल प्ले स्टोअरवर ५०० मिलियनपेक्षा अधिक डाऊनलोड आहेत, तर जिओसिनेमाचे १०० मिलियनपेक्षा अधिक डाउनलोड आहेत. जिओ सिनेमा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचं आहे. रिलायन्सच्या अॅन्युअल रिपोर्टनुसार, जिओ सिनेमा सरासरी २२५ मिलियन मंथली युझर्सपर्यंत पोहोचला आहे. याउलट, २०२३ च्या चौथ्या तिमाहीत डिस्ने+हॉटस्टारचे मंथली अॅक्टिव्ह युझर्स ३३३ मिलियन होते. यापूर्वी रिलायन्सच्या नियंत्रणाखालील वायकॉम १८ नं आपल्या विविध ओटीटी प्लॅटफॉर्मचं जिओ सिनेमात विलीनीकरण केलं होत . हे वूट ब्रँडचे प्लॅटफॉर्म होते.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील अब्जाधीश उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया युनिट्सच्या नॉन-न्यूज आणि करंट अफेअर्स टीव्ही चॅनेलशी संबंधित परवाने स्टार इंडियाला हस्तांतरित करण्यास सरकारनं नुकतीच मंजुरी दिली आहे. आता दोन्ही पक्ष विलीनीकरणाच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि सीसीआयच्या निर्देशांनुसार त्यांच्या व्यवसायात काही बदल करत आहेत.
एनसीएलटीनंही दिली मंजुरी
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया आणि मनोरंजन संपत्तीची मालकी असलेल्या वायकॉम १८ मीडिया आणि डिजिटल १८ मीडियाचे स्टार इंडियामध्ये विलीनीकरण करण्याच्या योजनेला एनसीएलटीनं ३० ऑगस्ट रोजी मंजुरी दिली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मीडिया मालमत्तांच्या विलीनीकरणामुळे देशातील सर्वात मोठा मीडिया समूह तयार होईल, ज्याचं मूल्यांकन ७०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.
नेटफ्लिक्स आणि जपानच्या सोनी सारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी आरआयएलनं संयुक्त उपक्रमात सुमारे ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली आहे. आरआयएलचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या संयुक्त उपक्रमाचे नेतृत्व करतील, तर उदय शंकर उपाध्यक्ष असतील.