नाशिक : दिंडोरी तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीत रिलायन्स उद्योग समूह १२०० कोटी रुपये गुंतवून औषधनिर्मिती उद्योग उभारणार आहे. यामुळे जवळपास साडेतीन हजार रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मोठा उद्योग यावा ही गेल्या वीस वर्षांपासूनची नाशिककरांची प्रतीक्षा आता संपली आहे. रिलायन्सनंतर मोठ्या उद्योगांकडूनही नाशिकमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे.
रिलायन्स उद्योग समूहातील रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या जीवरक्षक औषधे उत्पादन संशोधन आणि विकास यात काम करणाऱ्या उद्योगाने दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील औद्योगिक वसाहतीत १६१ एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मागितली आहे. नुकतीच शिष्टमंडळाकडून जागेची पाहणी करण्यात आली असून, एमआयडीसीकडून त्यांना नियमाप्रमाणे ऑफर लेटर दिले जाणार आहे. यानंतर अत्यंत कमी कालावधीमध्ये हा उद्योग सुरू होणार असून, प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीदेखील यातून होणार आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सध्या नवी मुंबईत २५ एकरवर आहे. उद्योग विस्तारासाठी त्यांनी सात ते आठ जागा बघितल्या होत्या. या उद्योगाचे शिष्टमंडळ नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी जागा पसंत केली.
इंडियन ऑइलकडूनही जागेची मागणीअक्राळे येथेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेदेखील ६० एकर जागेची मागणी केली असून, यात क्रायोजेनिक इंजिन्स आणि मोठमोठ्या ऑक्सिजन आणि इतर प्लांटसाठी लागणाऱ्या इंजिन्सचे उत्पादन केले जाणार आहे. लवकरच ही जागादेखील हस्तांतरित होऊ शकते. यातूनही शेकडो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.