Join us

आता प्रत्येक घरात रिलायन्स? मुकेश अंबानींचा मोठा प्लान; ३० ब्रँड्स खरेदी करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 5:21 PM

युनिलिव्हर, पेप्सिको, नेस्ले, कोकाकोला सारख्या कंपन्यांना थेट टक्कर देण्याच्या तयारीत रिलायन्स

मुंबई: रिलायन्सला देशातील प्रत्येक घरात नेण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानींनी विशेष योजना आखली आहे. देशाच्या रिटेल सेक्टरमधील दबदबा वाढवण्यासाठी अंबानींनी मोठी तयारी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज सध्याच्या घडीला देशातील सर्वात मोठी रिटेलर आहे. रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून सर्व कारभार हाताळला जातो.

युनिलिव्हर, पेप्सिको, नेस्ले, कोकाकोला यासारख्या बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देण्यासाठी रिलायन्स कंपनी कामाला लागली आहे. रिलायन्स रिटेल कंझ्युमर ब्रँड्सच्या माध्यमातून बड्या कंपन्यांना थेट टक्कर दिली जाणार आहे. येत्या ६ महिन्यांत ग्रॉसरी, हाऊसहोल्ड आणि पर्सनल केअरशी संबंधित ५०-६० ब्रँड्सचा पोर्टफोलियो तयार करण्याचा रिलायन्सचा प्लान आहे.

देशातील ३० लोकप्रिय लोकल कंझ्युमर ब्रँडसोबत रिलायन्सची बोलणी सुरू आहे. ही बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचं समजतं. रिलायन्स एक तर हे ब्रँड पूर्णपणे खरेदी करेल किंवा मग त्यांच्यासोबत जॉईंट व्हेंचर करेल. म्हणजेच त्यांच्यामध्ये हिस्सा खरेदी केला जाईल. यासाठी नेमकी किती खर्च करण्यात येणार याची माहिती अद्याप समोर आलेली आहे. रिटेल व्यवसायासाठी कंपनीनं वर्षाकाठी ५०० अब्ज डॉलर्सचं लक्ष्य ठेवल्याचं वृत्त रॉयटर्सनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

सध्या देशभरात रिलायन्सचे २ हजार ग्रॉसरी स्टोअर आहेत. याशिवाय कंपनीचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जिओ मार्टदेखील वेगानं वाढत आहे. सध्या तरी कंपनी आपल्या स्टोअरमधून अन्य कंपन्यांची उत्पादनं विकते. या स्टोअरमध्ये रिलायन्सची उत्पादनंदेखील असतात. मात्र त्यांची संख्या अतिशय कमी आहे. रिलायन्सची उत्पादनंदेखील घराघरात पोहोचावी, यासाठी अंबानी कामाला लागले आहेत. दर १० भारतीय घरांपैकी ९ घरांमध्ये आमचं उत्पादन असतं, असा युनिलिव्हर कंपनीचा दावा आहे. युनिलिव्हर प्रमाणेच रिलायन्सची उत्पादनंही घरोघरी असावीत, असा रिलायन्सचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स