नवी दिल्ली-
भारतात ७० च्या दशकात सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात धुमाकूळ घातलेला कॅम्पा कोला ब्रँड आता नव्यानं बाजारात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कॅम्पा कोला ब्रँड विकत घेतला आहे. नवी दिल्ली स्थित प्यूअर ड्रिंक्स ग्रूप रिलायन्सनं २२ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. याच प्यूअर ड्रिंक्स ग्रूप अंतर्गत 'कॅम्पा कोला' हे सॉफ्ट ड्रिंक तयार केलं जातं. अंबानींना आता सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रात एन्ट्री करायची आहे. मग त्यासाठी 'कॅम्पा कोला' हा अतिशय उत्तम मार्ग ठरेल हे अचूक हेरुन अंबानींनी 'कॅम्पा कोला' बनवणाऱ्या कंपनीची खरेदी केली आहे. कॅम्पा ब्रँडसह रिलायन्स समूहाने सॉफ्ट ड्रिंक ब्रँड Sosyo देखील आपल्या ताब्यात घेतला आहे.
'कॅम्पा ब्रँड' आणि 'कॅम्पा कोला' हे 1970 आणि 1980 च्या दशकात दोन लोकप्रिय शीतपेय ब्रँड होते. 1990 च्या दशकात 'कोका-कोला' आणि 'पेप्सिको'च्या प्रवेशानंतर या ब्रँडची लोकप्रियता शेवटी कमी झाली. रिलायन्स रिटेल आता या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोला, लिंबू आणि ऑरेंज फ्लेवर्समधील शीतपेय पुन्हा लॉन्च करेल. बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधारित कॅम्पा ब्रँड आता शीतपेयांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य अशा पेप्सी आणि कोका-कोलाला टक्कर देऊ शकतो. नवीन उत्पादन देशभरातील रिलायन्स रिटेल स्टोअर्स, जिओमार्ट आणि किराणा स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे.
मुंबईस्थित पेय पदार्थ उत्पादक प्युअर ड्रिंक्स ग्रुप हा 1949 ते 1970 पर्यंत भारतात कोका-कोलाचा एकमेव वितरक होता. त्यानंतर 1970 च्या दशकात या कंपनीनं स्वतःचा ब्रँड 'कॅम्पा कोला' लाँच केला. अल्पावधीच सॉफ्ट ड्रिंक्स क्षेत्रात कॅम्पा कोलानं आपली मजबूत पकड निर्माण केली होती. कॅम्पानं ऑरेंज फ्लेवर सॉफ्ट ड्रिंक लॉन्च करत सर्वांना सुखद धक्का दिला होता. कॅम्पा कोला एक भारतीय ब्रँड असून "द ग्रेट इंडियन टेस्ट" असं या सॉफ्ट ड्रिंकचं घोषवाक्य होतं. या ग्रुपचे मुंबई आणि दिल्ली येथे दोन बॉटलिंग प्लांट होते.
भारत सरकारनं १९९० साली उदारीकरणाची भूमिका घेतल्यानंतर या क्षेत्रात जगाची दारं पुन्हा उघडी झाली आणि कॅम्पा कोलाचा व्यवसाय हळूहळू कमी होऊ लागला. ज्यामुळे पेप्सिको आणि कोका-कोला सारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळाला.
२९ ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी यांनी कंपनीची रिटेल शाखा FMCG विभागात प्रवेश करण्यास सज्ज असल्याचं सूतोवाच केलं. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, भारतीयांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारी उच्च-गुणवत्तेची, परवडणारी उत्पादनं विकसित आणि वितरीत करण्याच्या उद्देशाने FMCG व्यवसाय सुरू करणार आहे.
रिलायन्स रिटेलला या व्यवसायात नवीन काही करण्याची गरजच नाही. कारण आधीच या क्षेत्रात रिलायन्सचा पाया मजबूत आहे. रिलायन्स मार्ट आणि त्याचे ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म JioMart असे भक्कम पर्याय रिलायन्सकडे उपलब्ध आहेत. Yeah!Colas आणि Snac Tac noodles सारखे ब्रँड हे कंपनीच्या मालकीचे ब्रँड आहेत. कंपनीच्या एकूण महसुलापैकी ६५ टक्के वाटा फॅशन आणि लाइफस्टाइल सेगमेंटसह कंपनीच्या इतर खासगी लेबल्सचा आहे. रिलायन्स रिटेलने २०२२ मध्ये २,५०० हून अधिक स्टोअर सुरू केले आहेत. आता एकूण स्टोअरची संख्या १५,००० पेक्षा जास्त आहे ज्याचे कार्यक्षेत्र ४२ दशलक्ष चौरस फूट इतके आहे.
रिलायन्स समहूच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या रिटेल विंगचे नेतृत्व ईशा अंबानी करेल असं जाहीर केलं आहे. तर आकाश अंबानी टेलिकॉम युनिट, रिलायन्स जिओ इन्फोकॉममध्ये लक्ष देईल आणि त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी समूहाचा एनर्जी व्यवसाय सांभाळणार आहे.