लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज ‘फ्युचर’ समूहाचा किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसाय आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या फ्युचर रिटेलची ५०० बिग बझार स्टोअर्स आपल्या ताब्यात घेणार असून, ३० हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेणार आहे. ही घडामोड अशा वेळी घडली आहे जेव्हा फ्युचर ग्रुप रिलायन्स इंडस्ट्रीजला विकण्यासाठी ॲमेझॉनसोबत कायदेशीर लढाई लढत आहे. या घडामोडीमुळे रिलायन्सचे नेटवर्क आणि विस्तार आणखी वाढणार आहे.
रिलायन्स या स्टोअर्सवरील फ्युचर संबंधित ब्रँड्सचे चिन्ह काढून स्वतःच्या स्टोअरमध्ये बदलणार आहे. स्टोअर्स रिलायन्स स्मार्ट नावाने ओळखले जातील, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत रिलायन्सच्या महसुलात पाचपट वाढ झाली आहे. रिलायन्स रिटेलचा मूळ रिटेल महसूल १८ अब्ज डॉलर आहे, जो त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांच्या एकत्रित कमाईपेक्षा जास्त आहे.