गांधीनगर - रिलायन्स ही एक गुजराती कंपनी होती, आहे आणि यापुढेही राहील. मला मी गुजराती असल्याचा अभिमान आहे असं विधान रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. गांधीनगर येथे झालेल्या १० व्या 'व्हायब्रंट गुजरात' ग्लोबल समिटच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचं कौतुकही अंबानी यांनी केले आहे.
मुकेश अंबानी यांनी म्हटलं की, गुजरात २०४७ पर्यंत ३ हजार अब्ज अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत भारताला ३५००० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यापासून कुठलीही ताकद रोखू शकत नाही. गुजरात हे आधुनिक भारताच्या प्रगतीचं प्रवेशद्वार आहे. रिलायन्स ही गुजराती कंपनी होती. आहे आणि यापुढेही राहील. रिलायन्सनं मागील १० वर्षात भारतात जागतिक स्तरावर १२ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे. त्यातील एक तृतीयांशाहून अधिक गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
#WATCH | Vibrant Gujarat Global Summit 2024 | Reliance Industries Chairman and MD Mukesh Ambani says, "...Reliance was, is and will always remain a Gujarati company...Reliance has invested over 150 billion dollars - Rs 12 Lakh Crores - in creating world-class assets and… pic.twitter.com/HCjCbaavAm
— ANI (@ANI) January 10, 2024
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा ठाम पाया रोवला आहे. रिलायन्स पुढील १० वर्षात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करून गुजरातच्या विकास गाथेत अग्रणी भूमिका बजावेल. विशेष म्हणजे रिलायन्स गुजरातला हरितक्रांतीमध्ये जागतिक नेतृत्व बनवण्यासाठी योगदान देईल. आम्ही गुजरातला २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेद्वारे उर्जेच्या निम्म्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करू. त्याचसोबत २०३६ मध्ये ऑलम्पिकसाठी भारताच्या यशासाठी रिलायन्स आणि रिलायन्स फाऊंडेशन गुजरातमधील अन्य भागीदारांसोबत मिळून शिक्षण, खेळ आणि कौशल्य विकासात मोठी सुधारणा करेल ज्यातून ऑलम्पिक खेळात आम्ही चॅम्पियन खेळाडू तयार करू शकू असंही मुकेश अंबानी यांनी म्हटलं.
दरम्यान, मला मी गुजराती असल्याचा अभिमान आहे. मी लहान असताना माझे वडील धीरुभाई अंबानी यांनी मला जे सांगितले ते मी कधीही विसरू शकत नाही. गुजरात ही मातृभूमी आणि कर्मभूमी आहे हे लक्षात ठेव. त्यामुळे मी हे पुन्हा सांगतो रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि यापुढेही राहील असं मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले.
मुकेश अंबानींच्या विधानावर मनसे आक्रमक
रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे असं आम्हाला वाटत होते. परंतु ती कंपनी गुजराती आहे आणि माझी कर्मभूमीही गुजरात आहे असं मुकेश अंबानींनी स्पष्ट केले. मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला? इथं तुमची कंपनी उभारण्यासाठी मराठी माणसांनी जमिनी दिल्या. जर तुम्हाला कंपनी गुजराती आहे असं वाटत असेल तर तुम्हाला गाशा गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा. मराठी माणसाने यापुढे रिलायन्सची कुठलीही गोष्ट घेताना विचार करायला हवा. आपण हे भारतीय कंपनीकडून नव्हे तर गुजराती कंपनीकडून घेतोय. फक्त गुजरातचा विकास करणे हा तुमचा उद्देश असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.