नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये रिलायन्सने 9 हजार 516 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. कंपनीने आतापर्यंतच्या इतिहासात मिळवलेला हा सर्वाधिक नफा आहे. कंपनीने गतवर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात कमावलेल्या नफ्यापेक्षा यावर्षीच्या नफ्याचे प्रमाण 17.4 टक्क्यांनी अधिक आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्सने एक पत्रक प्रसिद्ध करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. गतवर्षी याच कालावधीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 8 हजार 109 कोटी एवढा निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपन्नीच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन ते 1 लाख 56 हजार 291 कोटींवर पोहोचले आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या तिमाहीत कंपनीने 9 हजार 459 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. आरआयएलचे चेअरमन आणि मॅनेजिंक डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्सने या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. विशेषत: रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स बिझनेसने चांगले प्रदर्शन केले आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी हॅथवे केबल आणि डेन नेटवर्कसोबत रणनीतिक भागीदारीची घोषणा केली आहे.
रिलायन्सची रेकॉर्डब्रेक कमाई, दुसऱ्या तिमाहीत कमावला बंपर नफा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 9:32 PM