Join us  

Aadhaar Card युझर्सना दिलासा! आता 'या' तारखेपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 2:27 PM

Aadhaar Free Update Deadline Extend: आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची डेडलाईन आज संपणार होती. परंतु आता यात वाढ करण्यात आलेली आहे. पाहूया कधीपर्यंत तुम्हाला आधार मोफत अपडेट करता येईल?

Aadhaar Free Update Deadline Extend: आधार हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. अनेक योजनांसाठी आधारची गरज भासते. जर तुमचं आधार अपडेटेड नसेल तर योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात. परंतु ज्यांनी आतापर्यंत आपलं जुनं आधार अपडेट केलं नसेल त्यांच्यासाठी आता सरकारनं गूड न्यूज दिलीये. 

युआयडीएआयनं आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची डेडलाईन वाढवली आहे. आता ग्राहकांना १४ डिसेंबर २०२४ पर्यंत मोफत  (Free Aadhaar Update Deadline) आधार अपडेट करता येणार आहे. ही डेडलाईन आज संपणार होती. परंतु आता युआयडीएआयनं याला ३ महिन्यांसाठी पुढे वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

आज संपणार होती डेडलाईन

ज्यांची आधार कार्ज १० वर्षांपेक्षा जुनी आहेत त्यांना मोफत अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याची डेडलाईन आज संपणार होती. परंतु आता ती वाढवण्यात आलीये. यापूर्वीही ही डेडलाईन वाढवण्यात आली होती. पहिल्यांदा १४ मार्चची डेडलाईन वाढवून १४ जून करण्यात आली. त्यानंतर यात पुन्हा वाढ करून ती १४ सप्टेंबर केली गेली. परंतु आता १४ डिसेंबरपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे.

आधार कार्ड अपडेट का करावं?

आधार कार्ड हा आपल्या बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. जर तुमचं आधार कार्ड १० वर्षांपूर्वी जारी करण्यात आलं असेल आणि अद्याप अपडेट केलं गेलं नसेल तर तुम्हाला तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा नव्यानं सादर करण्याचा सल्ला दिला जातो. माहिती सुरक्षित आणि अचूक ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.

आधार ऑनलाइन अपडेट कसं करावं?

  • यासाठी सर्वप्रथम यूआयडीएआयच्या www.uidai.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • My Aadhaar वर क्लिक करा आणि Update Your Aadhaar निवडा.
  • Update Aadhaar Details (Online) वर जाऊन Document Update वर क्लिक करा.
  • आपला यूआयडी नंबर, कॅप्चा कोड एन्टर करा आणि Send OTP वर क्लिक करा.
  • ओटीपी टाकल्यानंतर लॉगिन करा.
  • जी माहिती अपेडट करायची आहे, ती निवडा आणि योग्य माहिती एन्टर करा.
  • आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि Submit वर क्लिक करा.
  • तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल ज्यातून तुम्ही अपडेटची स्थिती ट्रॅक करू शकता.
  • ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु बायोमेट्रिक माहिती (उदा. आयरिस, बोटांचे ठसे) ऑनलाइन अपडेट करता येणार नाहीत. 

आधार ऑफलाइन कसं अपडेट करावं?

  • यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा.
  • फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जमा करा.
  • तिथे तुमची बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल आणि तुम्हाला यूआरएन दिला जाईल.
टॅग्स :आधार कार्ड