नवी दिल्ली: गेल्या काही दिवसापासून देशात महागाई वाढली आहे. खाद्यतेल, पालेभाज्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काद्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. आता कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून सुमारे ५४,००० टन कांद्याची खुल्या बाजारात विक्री केली आहे. याबाबतची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली. कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडे सध्या २.५ लाख टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. सरकारने गेल्या आठवड्यातच राज्यांना कांद्याचा पुरवठा सुरू केला होता. त्यामुळे आता काद्यांच्या वाढत्या दरांना ब्रेक लागणार आहे.
'भारताला कोणाचेही ऐकण्याची...; पाकिस्तानच्या धमकीला क्रीडामंत्री अनुराग ठाकुरांनी दिले प्रत्युत्तर
गुवाहाटी सारख्या काही शहरांमध्ये बफर स्टॉकमधून सुमारे ५०,००० टन कांदे उतरवणार असल्याचा अंदाज आहे. कारण जिथे कांद्याच्या किमती जास्त आहेत. गेल्या ५ वर्षात सरकारने कांद्याचा बफर स्टॉक विक्रमी पातळीवर वाढवला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात सरकारने बफर स्टॉक म्हणून २.०८ लाख टन कांदा घेतला होता. पहिल्या व्यावसायिक वर्षात सरकारने १ लाख टन कांदा खरेदी केला होता.
महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पाऊस पडत राहिला तर आवक मोठ्या प्रमाणात घटू शकते. त्यामुळे दर झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.
जोपर्यंत नवीन पीक बाजारात येत नाही, तोपर्यंत कांद्याचे भाव वाढू शकतात. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नवीन कांद्याचे उत्पादन बाजारात येण्याची शक्यता आहे. याअगोदर कांद्याचा जुना साठा संपणार आहे. सध्या या साठ्यातून पुरवठा केला जात आहे. त्यामुळेच कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.