गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्यानं वाढत होते. परंतु बुधवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सध्या अक्षय तृतीयाही येणार आहे. या मुहुर्तावर सोन्याची खरेदी करणं शुभ मानलं जातं. अशातच जे सोन्याची खरेदी करण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या घसरणीनंतर या महिन्यात सोन्याचे दर वाढत होते. परंतु बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली.
एमसीएक्सवर बुधवारी सोन्याच्या दरात (वायदा) ०.१८ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या वायदा दरातही ०.६० टक्क्यांची घसरण झाली. एमसीएक्सवर चांदीचा दर ७१,५०० रूपये प्रति किलो इतका झाला. तर जून डिलिव्हरीवाल्या सोन्याचे दर एमसीएक्सवर ४७,५९९ रूपये प्रति १० ग्राम इतके झाले. तर ऑगस्टमध्ये डिलिव्हरीवाल्या सोन्याचे दर ११४ रूपयांनी घसरले. सर्राफा बाजाराबद्दल सांगायचं झालं तर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात ८९ रूपयांची घसरण होऊन तो ४७,७०० रूपये प्रति १० ग्राम इतका झाला. तर २३ कॅरेट सोन्याच्या दरातही ८९ रूपयांची आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात ८२ रूपयांची घसरण होऊन ते अनुक्रमे ४७,५०९ रूपये प्रति १० ग्राम आणि ४३,६९३ रूपये प्रति १० ग्राम इतके झाले. तर १८ कॅरेटच्या सोन्याचे दर ६७ रूपयांनी घसरून ३५,७७५ रूपये प्रति १० ग्राम इतके झाले. चांदीच्या दरातही बुधवारी १०२ रूपये प्रति किलोची घसरण झाली. या घसरणीनंतर चांदीचे दर ७०,८६७ रूपये प्रति किलो इतका झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा मोर्चा सोन्यातील गुंतवणूकीकडे असल्यानं आगामी काळात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.