गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या Paytm साठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने पेटीएमची पॅरेंट कंपनी One97 Communications Limited ला UPI मध्ये मल्टी-बँक मॉडेल अंतर्गत थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे. याचा अर्थ आता युजर्स आणि व्यापारी कोणत्याही व्यत्ययाशिवाय UPI व्यवहार करू शकतील. यामध्ये ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँकचा समावेश करण्यात आला आहे. या बँका OCL साठी PSP (पेमेंट सिस्टम प्रोव्हायडर) बँका म्हणून काम करतील.
येस बँक विद्यमान आणि नवीन UPI व्यापाऱ्यांसाठी OCL साठी व्यापारी बँक म्हणून काम करेल. "@Paytm" हँडल येस बँकेकडे रीडायरेक्ट केले जाईल, ज्यामुळे विद्यमान पेटीएम युजर्स आणि व्यापाऱ्यांना पेटीएमवरुन UPI व्यवहार आणि ऑटोपे करण्याची परवानगी मिळेल. परंतू, यासाठी विद्यमान हँडल नवीन पीएसपी बँकांकडे हस्तांतरित केले जाईल.
गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. ज्या अंतर्गत पेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंट बँकेशी लिंक असतील, त्या 15 मार्च नंतर काम करणार नाही. ही सेवा सुरू ठेवायची असेल तर ग्राहक आणि व्यापाऱ्यांना त्यांचे पेटीएम यूपीआय दुसऱ्या बँकेशी लिंक करावे लागेल. त्यानंतर आता पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन लिमिटेडने यासाठी 4 बँकांशी करार केला आहे.
तसेच, RBI ने NPCI ला पेटीएमची UPI सेवा कायम ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले होते. NPCI ला अॅडव्हायजरी जारी करताना मध्यवर्ती बँकेने म्हटले होते की, पेटीएम ॲपद्वारे सेवा सुरू ठेवण्यासाठी NPCI ने पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून हाय व्हॉल्यूम UPI व्यवहार हाताळण्याची क्षमता असलेल्या बँकांची निवड करावी. त्यानंतर आता NPCI ने Paytm ला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) परवाना दिला आहे.