Join us

₹२५००००००० च्या दंडापासून मुकेश अंबानींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं सेबीची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 9:08 AM

Mukesh Ambani News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण?

Mukesh Ambani News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित प्रकरणात सिक्युरिटीज अपीलल ट्रिब्युनलच्या (सॅट) आदेशाविरोधात सेबीची (SEBI) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. शेअर्सचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नोव्हेंबर २००७ मध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) तत्कालीन रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडच्या (RPL) शेअर्सच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणात अंबानी आणि इतर दोन पक्षांवर दंड ठोठावला होता, जो सॅटनं फेटाळून लावला. याविरोधात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अपील केलं होतं. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठानं सॅटच्या आदेशात हस्तक्षेप करू इच्छित नसल्याचं स्पष्ट केलं.

खंडपीठानं काय म्हटलं?

"या याचीकेत आमच्या हस्तक्षेपाचा काही कायदेशीर प्रश्नच उद्भवत नाही. यासाठी याचिका फेटाळली जात आहे. तुम्ही अशाप्रकारे एका व्यक्तीचा वर्षानुवर्ष पाठलाग करू शकत नाही," असं खंडपीठानं म्हटलं. सॅटच्या ४ डिसेंबर २०२३ च्या आदेशाविरोधात सेबीनं न्यायालयात धाव घेतली होती.

एकूण दंड किती होता?

जानेवारी २०२१ मध्ये सेबीनं आरपीएल प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) २५ कोटी रुपये, अंबानींना १५ कोटी रुपये, नवी मुंबई सेझ प्रायव्हेट लिमिटेडला २० कोटी रुपये आणि मुंबई सेझ लिमिटेडला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स बऱ्याच दिवसांपासून घसरत आहेत. सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण झाली.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीसर्वोच्च न्यायालय