नवी दिल्ली : करदात्यांच्या तक्रारी दूर होण्याची सध्याची गती ही ‘असमाधानकारक’ असून, या तक्रारी जास्तीत जास्त दोन महिन्यांत दूर झाल्या पाहिजेत, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकर विभागाला सांगितले आहे.
सीबीडीटीने आपल्या सगळ्या विभागीय प्रमुखांना तातडीने पाठविलेल्या पत्राद्वारे ही सूचना करण्यात आली आहे, असे सीबीडीटीचे अध्यक्ष अतुलेश जिंदाल यांनी सांगितले. करदात्यांच्या तक्रारींच्या निराकरणाकडे सरकारचे विशेष लक्ष असल्यामुळे तक्रारींवर तातडीने उपाय शोधा, असे जिंदाल यांनी त्यात म्हटले आहे. गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तक्रार निवारणाच्या मुद्यावर आयकर विभागाची खरडपट्टी काढली होती. अशाच प्रकारच्या सूचना नुकत्याच सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साईज अँड कस्टम्सअंतर्गत असलेल्या कस्टम्स आणि केंद्रीय अबकारी विभागालाही देण्यात आल्या आहेत.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार निवारण हा विषय प्राधान्याने हाती घेऊन त्यातील प्रगतीची माहिती कळवावी, असे जिंदाल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आयकर विभागात सुमारे ७,८०,०८१ तक्रारी वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून निराकरणाची वाट बघत आहेत. १,६९६ तक्रारी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहेत. करदात्याची तक्रार दोन महिन्यांत दूर झाली पाहिजे, असे आमच्या नागरी जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटले असले तरी तक्रारींचे निराकरण व्हायची गती ही असमाधानकारक आहे.
मंडळाने वेळोवेळी सूचना करूनही फार मोठ्या प्रमाणावरील तक्रारी या त्या प्राप्त झाल्याच्या दिवसापासून ६० दिवसांच्या मुदतीत दूर झालेल्या नाहीत, असे जिंदाल यांनी देशातील सीबीडीच्या प्रधान मुख्य आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागीय प्रमुखांनी तक्रारी दूर होतील यासाठी व्यक्तिश: लक्ष ठेवून अधिकाऱ्यांना त्या अतिशय प्राधान्याने दूर करण्यास सांगितले पाहिजे, असे पत्रात म्हटले आहे.
तक्रार आल्यानंतर ६० दिवसांत तिचे निराकरण झाले पाहिजे. एखाद्या तक्रारीवर अंतिम निर्णय घेण्यास दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार असेल तर तसे उत्तर संबंधिताला दिले गेले पाहिजे, असे हे पत्र म्हणते.
करदात्यांच्या तक्रारी २ महिन्यांत दूर करा
करदात्यांच्या तक्रारी दूर होण्याची सध्याची गती ही ‘असमाधानकारक’ असून, या तक्रारी जास्तीत जास्त दोन महिन्यांत दूर झाल्या पाहिजेत, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आयकर विभागाला सांगितले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2016 03:34 AM2016-02-08T03:34:10+5:302016-02-08T03:34:10+5:30