रेमंड या प्रसिद्ध उद्योग समुहाचे मालक असलेल्या सिंघानिया कुटुंबातील वाद मागच्या काही वर्षांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. रेमंड समुहाचे एमडी गौतम सिंघानिया यांनी वडील विजयपत सिंघानिया यांना उद्योग समुहासह घरातून बाहेर काढल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. या घटनेनंतर विजयपत सिंहानिया हे भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान, सिंघानिया पिता-पुत्रांमधील वाद आणि दुरावा आता मिटल्याची माहिती समोर येत आहे. गौतम सिंघानिया यांनी त्यांचे वडील विजयपत सिंघानिया घरी आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये गौतम सिंघानिया म्हणाले की, आज माझे वडील माझ्या घरी आले आहेत, त्यामुळे मी आनंदी आहे. त्यांचे आशीर्वाद घेत आहे. बाबा तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी खूप शुभेच्छा, असं गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
विजयपत सिंघानिया यांनी काही वर्षांपूर्वी रेमंड कंपनीचं नेतृत्व आणि हजारो कोटींचे शेअर मुलगा गौतम सिंघानिया यांच्या नावावर केले होते. त्यानंतर सिंघानिया पिता-पुत्रांमध्ये वाद झाला होता. त्याची परिणती विजयपत सिंघानिया यांच्या बेघर होण्यात झाली होती. त्यानंतर विजयपत सिंघानिया यांनी आपण घेतलेल्या निर्णयाबाबत खंत व्यक्त केली होती.