नवी दिल्ली - गेल्याच महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेचे बजेट कोलमडले आहे. तर, आता सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आणखी महागलं. कारण, जून महिन्यात RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले होते. त्यामध्ये मध्यवर्ती बँकेने ०.५० टक्क्यांनी रेपो रेट वाढवला. त्यामुळे गृह कर्जापासून सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मुद्रित निती समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या बैठकीत आज सकाळीच 0.50 टक्क्यांनी रेपो दरात वाढ केल्याचा निर्णय घेण्यात आला.
आरबीआयच्या आजच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, गेल्या 4 महिन्यात तब्बल 1.40 टक्क्यांनी हा रेपोदर वाढला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना फटका बसणार असून घराचे स्वप्न महागणार आहे. पर्नसल लोनसह गृहकर्जाच्या व्याजातही या निर्णयामुळे वाढ होणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या मुद्रित निती समितीची ही बैठक सोमवार ते बुधावार या तीन दिवसांत होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर, बुधवार ते शुक्रवार अशा नियोजित वेळेनुसार ही बैठक पार पडली. महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासूनच रेपो रेटमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली. मे 2022 मध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर जून महिन्यात 0.50 टक्के आणि आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा 0.50 टक्के रेपो रेट वाढला आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 महिन्यात 1.40 टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जवळपास 2 वर्षे रेपो रेट 4 टक्क्यांपर्यंत स्थीर होता, तो आता 5.40 टक्के एवढा पोहोचला आहे. दरम्यान, कोरोना महासाथीच्या पूर्व पातळीवर रेपो दर पोहोचला आहे.
काय होईल परिणाम
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यास सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होईल कारण बँकांच्या कर्जाची किंमत वाढेल. रेपो रेट हा दर आहे ज्यावर बँका आरबीआयकडून पैसे घेतात. हा दर वाढल्यावर बँकांना जास्त दराने कर्ज मिळेल, त्यामुळे ते त्यांच्या ग्राहकांकडून जास्त दराने व्याजही घेतील. पतधोरण जाहीर होण्यापूर्वीच कॅनरा आणि HDFC बँकेने कर्जदारांना झटका दिला. एचडीएफसी बँकेने कर्जदर ०.३५ टक्क्यांनी वाढवला आहे. ७ जून २०२२ पासून नवीन कर्जदर लागू झाला आहे. या दरवाढीने कर्जाचा मासिक हप्ता वाढेल. त्याशिवाय गृह कर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज आणि इतर नवीन कर्ज जादा दराने घ्यावे लागणार आहे.