देशात महागाईचा दर कमी झाला असला तरी सर्वसामान्यांवरील महागाईचा बोजा सातत्याने वाढतच आहे. आज रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंटने वाढ केली. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. या काळात रेपो रेट एकूण २.५० एवढा वाढला आहे. त्यामुळे सध्या रेपो रेट हा ६.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारचे होम, ऑटो आणि पर्सनल लोन वाढले आहेत. रेपो रेटमध्ये आज झालेल्या वाढीनंतर ईएमआयमध्ये होणाऱ्या वाढीचं गणित पुढीलप्रमाणे आहे.
समजा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने मे २०२२ मध्ये रेपो रेटमध्ये वाढ होण्यापूर्वी ३० लाख रुपयांचं होम लोन हे ६.७ टक्के व्याज दराने २० वर्षांच्या कालावधीसाठी घेतलं असेल. तर त्यावेळी त्याला २२ हजार ७२२ रुपये ईएमआय द्यावी लागत असेल. मात्र गेल्या काही कालावधील सातत्याने सहा वेळा वाढ होऊन रेपो रेटमध्ये २.५० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर त्याच कर्जावरील व्याजदर हा ९.२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्या हिशेबाने आता EMI ही दरमहा २७ हजार ३२९ रुपये एवढी होणार आहे. म्हणजेच आता ४ हजार ६५७ रुपये अधिक ईएमआय भरावी लागणार आहे.
होमलोन प्रमाणेच ऑटो लोनचा विचार केल्यास तुम्ही कुठलीही कार १० लाख रुपयांना खरेदी केली आहे. त्यासाठी तुम्ही ८ लाख रुपयांचं कर्ज ५ वर्षांसाठी घेतलं असेल तर ६ टक्के व्याजदराने तुम्हाला दरमहा १५ हजार ४६६ रुपये भरावे लागत असतील. मात्र आता व्याजदर ८.५० टक्के झाला असेल. तर तुमचा ईएमआय वाढून १६ हजार ४१३ रुपये झाला असेल. म्हणजेच दरमहा तुमच्यावर ९४७ रुपयांनी ईएमआयचे ओझे वाढणार आहे.
कोरोना काळामध्ये रेपोरेट हा ४ टक्क्यांवर स्थिर होता. मात्र त्यानंतर महागाई वाढल्याने रेपोरेटमध्येही सातत्याने वाढ करावी लागली. रिझर्व्ह बँकेने सलग सहा वेळा रेपो रेट वाढवला आहे. आता फेब्रुवारी महिन्यात रेपो रेट कम होईल अपेक्षा होती. मात्र रिझर्व्ह बँकेने या अपेक्षांना धक्का दिला आहे.